महाराष्ट्राचे मंत्रिमंडळच बरखास्त करा; भाजपा प्रदेशाध्यक्षांची मागणी
Jan 22, 2022, 13:30 IST
मुंबई ः ९ मजली इमारत अधिकृत आणि ४ मजले अनधिकृत अशा इमारतीवर बसलेला ४ कोटी ३० लाख रुपयांचा दंड आणि व्याज मंत्रिमंडळ बैठकीत माफ करणे हे बेकायदेशीर व घटनाविरोधी आहे. त्यामुळे संपूर्ण मंत्रिमंडळाविरोधात गुन्हा दाखल करून हे मंत्रिमंडळ बरखास्त करावे, अशी मागणी भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी राज्यपालांकडे केली आहे.
शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांच्या छाबय्या विहंग गार्डनला दिलेल्या दंडमाफीवरून भाजप आक्रमक झाले असून, आज, २१ जानेवारीला चंद्रकांत पाटील व अन्य नेत्यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेतली. यावेळी संपूर्ण प्रकरणाची माहिती देत मंत्रिमंडळ बरखास्त करण्याच्या मागणीचे निवेदन दिले. आम्ही कोणाही एका व्यक्तीला लाभ होईल असे वर्तन करणार नाही, अशी शपथ मंत्रिमंडळाने घेतलेली असते. मग अशाप्रकारे अनधिकृत बांधकामांना लागलेला दंड, व्याज माफ कसे होऊ शकते. पूर्ण महाराष्ट्राचे याबाबत धोरण ठरले पाहिजेत. आमदार प्रताप सरनाईक यांना फायदा होण्यासाठी घेतलेला निर्णय असल्याचे श्री. पाटील म्हणाले.