ऐकलं का... कोविशिल्डचा बूस्टर डोस ओमिक्रॉनला जवळही फिरकू देत नाही!
Dec 24, 2021, 11:57 IST
नवी दिल्ली : अरेव्वा.. आपली कोविशिल्ड लस लईच भारी निघाली आहे. सध्या आपल्या देशात ९० टक्के कोविशिल्ड लस दिली जात असून, या लसीचा बुस्टर डोस कोरोनाचा नवा विषाणू ओमिक्रॉनला जवळपासही फिरकू देणार नाही, असे संशोधन समोर आले आहे. ॲस्ट्राझेनेका लसीच्या बूस्टर डोसमुळे ओमिक्रॉनविरुद्ध अँटिबॉडीत लक्षणीय वाढ होत असून,ॲस्ट्राझेनेकाचा बूस्टर डोस घेणाऱ्यांना ओमिक्रॉनचा संसर्ग होणार नाही. त्यामुळे भारतीयांना मोठा दिलासा मिळाला आहे. ॲस्ट्राझेनेका (AstraZeneca) म्हणजेच कोविशिल्ड.
ऑक्सफर्ड विद्यापीठ आणि AstraZeneca यांनी AstraZeneca लस संयुक्तपणे बनवलेली आहे. सध्या ती लस भारतात सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाकडून (SII) उत्पादित केली जाते. ही लस भारतात Covishield नावाने दिली जात आहे. भारतात आतापर्यंत दिलेल्या लसींपैकी सुमारे ९० टक्के लस कोविशिल्डची दिली गेली आहे, हे विशेष. कोविशिल्डचा बूस्टर डोस (म्हणजे तिसरा डोस) घेतलेल्या ४१ नागरिकांच्या रक्त नमुन्यांचे विश्लेषण ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीने केल्यानंतर कोविशिल्ड ओमिक्राॅनला जवळपासही फिरकू देत नाही, हे समोर आले. बूस्टर डोस घेतल्यानंतर ओमिक्रॉनविरुद्ध खूप मजबूत अँटीबॉडी तयार होते. भारतात सध्या बूस्टर डोस दिला जात नाही. पण ८० देशांत बूस्टर डोस दिले जात आहेत. इस्त्रायल तर चौथ्या डोसची तयारी करतोय.