मुख्यमंत्री असूनही शिवसेनेला निधी वाटपात ठेंगा!; राष्ट्रवादी आघाडी"वर'

 
file photo
मुंबई (वृत्तसंस्‍था) ः राज्यात महाविकास आघाडीचे सरकार आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या मार्गदर्शनाखाली स्थापन झालेल्या या सरकारचे नेतृत्व शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे करत आहेत. मात्र मुख्यमंत्री शिवसेनेचा असला तरी निधी वाटपात मात्र शिवसेनेचे आमदार तिसऱ्या स्थानी असल्याचे समोर आले आहे. निधी मिळवण्यात राष्ट्रवादी काँग्रेस अव्वल तर काँग्रेस दुसऱ्या स्थानी आहे. मंत्रिमंडळात अर्थ खाते राष्ट्रवादीकडे आहे. त्यामुळे निधी वाटपात राष्ट्रवादी काँग्रेस अव्वलस्थानी असल्याचे बोलले जात आहे.

पर्यावरण मंत्री असलेले आदित्य ठाकरे यांच्या खात्याकडून ४२० कोटी रुपयांची तरतूद झाली असली तरी आतापर्यंत फक्त तीन टक्केच खर्च करण्यात आला आहे. त्यामुळे पर्यावरण मंत्र्यांची व दस्तरखुद मुख्यमंत्र्यांचे सुपूत्र असलेल्या आदित्य ठाकरे यांची ही अवस्था असेल तर शिवसेनेच्या अन्य मंत्र्यांची स्थिती काय, याबद्दल न बोललेलेच बरं. शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस या तीन पक्षांमध्ये निधी वाटपात मोठी असमानता असल्याचे समोर येत आहे.

सर्वाधिक कमी निधी हा शिवसेनेच्या वाट्याला असलेल्या खात्यांना मिळाला आहे. सत्तास्थापन करते वेळी तिन्ही पक्षांचा किमान समान कार्यक्रम ठरलेला असताना निधी वाटपात आणि खर्चात होत असलेल्या भेदभावामुळे आघाडीमधील  बिघाडी कधीही उफाळून येऊ शकते. एबीपी माझाने दिलेल्या वृत्तानुसार २०२०- २१  या वर्षातील निधी वाटपाच्या आकडेवारीनुसार सर्वाधिक आमदार असलेला आणि मुख्यमंत्रीपद असलेला शिवसेना पक्ष पिछाडीवर पडलेला आहे.

शिवसेनेच्या ५९ आमदारांच्या वाट्याला ५२ हजार २५५ कोटी रुपये निधी मिळाला तर ४२ आमदार असलेल्या काँग्रेसला १ लाख २४ हजार कोटी रुपयांचा निधी मिळाला आहे आणि राष्ट्रवादीच्या ५३ आमदारांनी २ लाख २४हजार ४११  कोटी रुपयांचा निधी मिळवला आहे. शिवसेनेपेक्षा पाच आमदार कमी असून सुद्धा राष्ट्रवादीचे आमदार निधी मिळवण्यात आघाडीवर आहेत.