काँग्रेसमुळेच सरकार टिकून; अशोक चव्हाणांची "बिघाडी'!

 
file photo
जालना (वृत्तसंस्‍था) : राज्यात महाविकास आघाडीचे सरकार आम्ही सोबत आहोत म्हणून आहे, असे वक्तव्य काँग्रेसचे नेते, माजी मुख्यमंत्री आणि राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी केले. जालन्यातील एका प्रचारसभेत बोलताना त्यांनी हे विधान केले. राज्यातील महाविकास आघाडी सरकारमध्ये भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचा वाटा मोठा आहे. हे सरकार मजबूत राहिले पाहिजे अशी आमची प्रामाणिक भूमिका आजवर राहिली. त्‍यामुळेच सरकार तग धरून आहे, असे चव्हाण म्हणाले.
सर्व कामांवर लक्ष एकत्रित करून राज्याच्या विकासाचा गाडा पुढे चालला पाहिजे यासाठी महाविकास आघाडीचे प्रयत्न आहेत. महाविकास आघाडी सरकारमध्ये काँग्रेसचा वाटा मोठा आहे. आम्ही आहोत म्हणून सत्ता टिकून आहे हे मुद्दाम सांगितले पाहिजे. काँग्रेसच्या ताकदीने महाविकास आघाडीचा विचारपूर्वक निर्णय आपण घेतला आहे. सरकार टिकावे अशी आमची प्रामाणिक इच्छा असल्याचे अशोक चव्हाण म्हणाले. अशोक चव्हाण यांच्या वक्तव्याने राष्ट्रवादी आणि शिवसेनेला इशारा दिल्याचे बोलले जात आहे. काँग्रेसला डावलून तुम्हाला राज्यात निर्णय घेता येणार नाही, असा इशारा चव्हाण यांनी शिवसेना आणि राष्ट्रवादीला दिल्याचे राजकीय जाणकारांचे मत आहे.