बुलडाणा लाइव्हच्या"त्या" बातमीनंतर मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांना जाग आली! सिंदखेडराजा तालुक्यातील अपघातावर शोक व्यक्त केला; मृतकांच्या वारसांना प्रत्येकी १० लाखांची मदत

 
ghj
बुलडाणा( बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): मेहकर - सिंदखेडराजा रस्त्यावरील पळसखेड चक्का गावाजवळ आज,२५ मे च्या सकाळी एसटी बस आणि कंटेनर चा भीषण अपघात झाला.  या अपघातानंतर बुलडाणा जिल्ह्यासह संपूर्ण राज्यात शोककळा पसरली असताना मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी साध्या शोकसंवेदना व्यक्त केल्या नसल्याचे वृत दुपारी बुलडाणा लाइव्ह ने प्रकाशित केले होते. मुख्यमंत्री वाशिमच्या खासदार भावना गवळी यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा द्यायला विसरले नाहीत,मात्र सिंदखेडराजाच्या अपघातावर त्यांनी चकार शब्दही काढला नसल्याचे बुलडाणा लाइव्ह च्या वृत्तात म्हटले होते.
 

अखेर अपघाताच्या साडेतेरा तासानंतर संध्याकाळी ८ वाजून ४६ मिनिटांनी मुख्यमंत्र्यांच्या अधिकृत ट्विटर संकेतस्थळावरून ट्विट करण्यात आले. त्यात अपघाताबद्दल मुख्यमंत्र्यांनी शोक व्यक्त केला. अपघातात ठार झालेल्या मृतकाच्या वारसांना तात्काळ १० लाख रुपयांची मदत देण्याच्या सूचना दिल्या आहेत, तसेच जखमींवर शासकीय खर्चाने योग्य ते उपचार करण्यात येणार असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटले आहे. या अपघाताविषयी कळताच परिवहन विभागाकडून माहिती घेतली तसेच प्रशासनाने प्रवाशांना व त्यांच्या नातेवाईकांना मदत करण्याचे निर्देश दिल्याचेही मुख्यमंत्री शिंदे यांनी म्हटले आहे. मुख्यमंत्री कार्यालयाकडून करण्यात आलेले अपघातासंदर्भातील ट्विट उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रिट्विट केले आहे.