भाजपाच्या नेत्यानेच राम मंदिराची हडपली जमीन; नवाब मलिक यांचा नवा आरोप

 
नवी मुंबई : प्रभू रामचंद्रांचे नाव घेऊन राजकारण करणारे भाजपाचेच नेते राम मंदिराची जमीन हडपत आहेत. सुरेश धस यांनी आष्टीतील वक्फ बोर्ड आणि देवस्थानांची हजारो कोटींची जमीन बळकावल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी केला आहे. नवी मुंबईत पत्रकार परिषद घेऊन त्‍यांनी हा नवा गौप्यस्‍फोट केला. आष्टीचे माजी आमदार भीमराव दोंदे यांचाही यात सहभाग असल्याचे ते म्‍हणाले. ईडीने राज्यभरातील देवस्थानांच्या जमीन गैरव्यवहार प्रकरणाचा तपास करावा आणि सत्य समोर आणून या नेत्‍यांवर कारवाई करावी, अशी मागणी मलिक यांनी केली आहे. विशेष म्‍हणजे, धस हे भाजपात येण्याआधी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये होते. त्‍यांची राजकीय कारकीर्द राष्ट्रवादीतच फुलली आहे हे विशेष.
राज्‍यातील देवस्‍थांनाचा मोठा घोटाळा उघडकीस आणल्याचा दावा करून मलिक म्‍हणाले, की औरंगाबाद, नांदेड, बुराहण शाह वली परभणी, पुणे, जालना, बदलापूर आणि बीडमध्ये देवस्‍थानांचे ११ जमीन घोटाळे झाले आहेत. पैकी तीन मुस्लिम आणि सात हिंदू देवस्थाने असल्याचे ते म्‍हणाले. आष्टीतील देवस्थान जमीन गैरव्यवहारात धस यांच्यावर आरोप करताना मलिक म्‍हणाले, की यात मच्छिंद्र मल्टीस्टेट सोसायटीचाही सहभाग आहे. सोसायटीच्या माध्यमातून देवस्थानांच्या जमिनी हडप केल्या. सोसायटीतील सदस्यांच्या खात्यात पैसे गेले. त्‍यातून खरेदी खत करण्यात आले. राम खाडे यांच्या ईडीकडील तक्रारीत सुरेश धस आणि भीमराव दोंदे यांचे नाव असल्याकडे ते म्‍हणाले.