Big Breaking : 'स्वाभिमानी' नेते रविकांत तुपकरांना अटक

अन्‍नत्याग आंदोलनामुळे कायदा-सुव्यवस्‍थेचा प्रश्न पोलिसांनी केला पुढे, मात्र मागण्या मान्य होईपर्यंत कोठडीतही अन्‍नाचा कण पोटात जाणार नाही, तुपकरांचा निर्धार!
 
 
बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः सोयाबीन, कापूस उत्पादकांच्या विविध मागण्यांसाठी आरपारची लढाई लढण्याच्या उद्देशाने स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांनी उपराजधानी नागपुरातील संविधान चौकात काल, १७ नोव्‍हेंबरला सकाळपासून अन्‍नत्याग सत्याग्रह सुरू केला होता. संचारबंदी, पोलिसांनी नाकारलेली परवानगी, बजावलेल्या नोटिसा अन्‌ प्रकृती चांगली नसतानाही तुपकरांनी अन्‍नत्‍याग सुरू केला. मात्र रात्री उशिरा साडेअकराच्या सुमारास तुपकरांना पोलिसांनी कायदा, सुव्यवस्‍था आणि १४४ कलम लागू असल्याच्या कारणाखाली अटक केली. त्यांना अमरावतीमार्गे बुलडाण्यात आणण्यातआले. अटकेमुळे आंदोलनात कोणताही फरक पडणार नाही, असे अटकेवेळी रविकांत तुपकर म्‍हणाले. अटकेपूर्वी पोलिसांनी तुपकर यांची वैद्यकीय तपासणी करून घेण्यात आली होती. दरम्‍यान, तुपकरांनी निर्धार कायम ठेवला असून, प्राण गेले तरी मागे हटणार नाही. मागण्या मान्य होईपर्यंत अन्‍नाचा कणही पोटात जाणार नाही, असे म्हणत त्यांच्या बुलडाणा शहरातील अष्टविनायकनगरातील निवासस्थानासमोरच अन्‍नत्याग सत्याग्रह सुरू ठेवला आहे. सकाळी बुलडाण्यात दाखल झाल्यानंतर घरासमोर सतरंजीवर बसून त्यांनी अन्‍नत्याग सत्याग्रह सुरू केला. यावेळी नागपूर व बुलडाणा पोलिसांचा कडा पहारा त्यांच्या निवासस्थानसमोर लावण्यात आला आहे. नागपूर पोलिसांनी सरकारच्या इशाऱ्यावर दडपशाही करून मला अटक केली. मात्र कुठेही नेण्यात आले तरी सोयाबीन, कापूस उत्पादक शेतकऱ्यांच्या मागण्या होत नाहीत तोपर्यंत अन्‍नत्याग आंदोलन सुरूच ठेवेन अशी मी प्रतिज्ञा घेतली आहे. त्यामुळे निवासस्थानाबाहेर सुद्धा हा अन्‍नत्याग सत्याग्रह सुरूच राहणार आहे, असे तुपकर म्‍हणाले.


कायदा हातात न घेता शेतकऱ्यांनी ठरल्याप्रमाणे शेतकऱ्यांनी १८ नोव्हेंबरला प्रभात फेऱ्या काढून गावातील चावडी किंवा पारावर धरणे वा ठिय्या आंदोलन करा, १९ नोव्हेंबरला गावाजवळच्या मार्गावर रास्ता रोको, चक्का जाम करा. २० नोव्हेंबरला आपापल्या कार्यक्षेत्रात कडकडीत बंद पाळा, असे आवाहनही त्‍यांनी यावेळी केले. दरम्‍यान, तुपकरांच्या आंदोलनामुळे शेतकऱ्यांच्या संतापात भर पडली असून, शांततेच्या मार्गाने सुरू असलेले आंदोलन कायदा-सुव्यवस्‍थेच्या नावाखाली चिरडण्याचाच हा प्रयत्न झाल्याच्या प्रतिक्रिया व्यक्‍त होत आहेत.

रविकांत तुपकर यांच्यासोबत शेकडो कार्यकर्ते व शेतकऱ्यांनीही अन्‍नत्याग सुरू केलेला आहे. जोपर्यंत मागण्या पूर्ण होत नाहीत तोपर्यंत अन्‍नाचा कणही पोटात जाणार नाही, असे तुपकर यांनी निक्षून सांगितले आहे. त्‍यामुळे सरकारपुढेही मोठा पेच निर्माण झाल्याचे चित्र आहे. पोल्ट्री संघटनेने आयातीत सोया पेंड वाढविण्याची मागणी केली आहे. यामुळे सोयाबीनचे भाव आणखी पडण्याची भीती श्री. तुपकर यांनी संध्याकाळी पत्रकारांशी बोलताना व्यक्‍त केली होती. हे केवळ स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे आंदोलन नसून, राजदरबारी देखील उपेक्षित असलेल्या लाखो सोयाबीन, कपाशी उत्पादकांचे आंदोलन आहे. सोयाबीनला किमान ८ हजार, कपाशीला १२ हजार रुपये भाव जाहीर करावा. सोया पेंडची आयात थांबवावी, १०० टक्के पीकविमा, शेतातील लोडशेडिंग व कनेक्शन कापणे बंद करा, सक्तीची वीज वसुली बंद करा, अतिवृष्टीग्रस्तांना भरीव मदत करा आदी मागण्यांसाठी  सुरू झालेले आंदोलन आता तुपकरांच्या अटकेनंतर कोणत्या वळणावर जाते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.