Amazon Ad

BIG BREAKING रविकांत तुपकरांनी पुण्यात घेतला मोठा निर्णय! "महाराष्ट्र क्रांतीकारी आघाडी"ची घोषणा! राजू शेट्टींच्या आरोपंनही खरमरीत उत्तर;

अंगावर याल तर शिंगावर घेऊ म्हणाले; महाराष्ट्रात २५ जागांवर विधानसभा लढवणार..
 
पुणे(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी आज,२४ जुलैला पुण्यात घेतलेली बैठक चांगलीच गाजली. राज्यातील ३२ जिल्ह्यातील प्रमुख पदाधिकारी या बैठकीसाठी पुण्यात पोहचले. बैठकीच्या आधी रविकांत तुपकर यांनी पदाधिकारी कार्यकर्त्यांच्या भावना जाणून घेतल्या. काहींनी नवीन पक्ष, नवीन आघाडी, नवी संघटना काढावी अशा सूचना केल्या. अखेर सर्वांची मते विचारात घेऊन शेवटी भाषणात तुपकर यांनी मोठी घोषणा केली. राज्यात आगामी विधानसभा निवडणूक "महाराष्ट्र क्रांतीकारी आघाडी" या नावाने लढवणार असल्याची घोषणा तुपकर यांनी केली. यावेळी सभागृहात टाळ्यांचा एकच गजर झाला.
रविकांत तुपकर यांनी भाषणातून राजू शेट्टी यांच्यावर देखील हल्लाबोल चढवला. तुम्ही काय माझी हकालपट्टी करता शेतकऱ्यांनी तुमचीच हकालपट्टी केली आहे असा टोला तुपकर यांनी लगावला. आयुष्याची २२ वर्षे शेतकऱ्यांसाठी लढलो, लाठ्या काठ्या खाल्ल्या, जेल मध्ये गेलो, त्यामुळे लोकांनी भरभरून प्रेम दिलं..मात्र लोकांचे आपल्याला मिळत असलेले प्रेम पाहून शेट्टींच्या डोळ्यात खुपले,आपल्यापेक्षा मोठा माणूस झालेला शेट्टींना चालत नाही असेही तुपकर म्हणाले. महाराष्ट्र क्रांतीकारी आघाडी आगामी विधानसभा निवडणुकीत पूर्ण ताकदीने लढेल, राज्यभरातील उमद्या तरुणांना, सामान्य घरातून आलेल्या तरुणांची मोठी फळी महाराष्ट्रात उभारणार असल्याचे तुपकर यावेळी म्हणाले..
अनेकांनी आपल्याला व्हीलन करण्याचा प्रयत्न केला. हकालपट्टीची बातमी जेव्हा माझ्या कानावर आली, ती माझ्यासाठी शॉकिंग होती..माझ्या डोळ्यासमोर २२ वर्षे चळवळीचा संघर्ष येऊन गेला. चळवळीसाठी आम्ही घरादाराची पर्वा केली नाही, घरादारावर तुळशीपत्र ठेवून , संसाराची राखरांगोळी करून आमच्यासारख्या हजारो कार्यकर्त्यांनी ही संघटना वाढवली असे तुपकर म्हणाले. महाराष्ट्राचा कानाकोपरा आपण चळवळीसाठी पिंजून काढला, गरम रक्ताचा असल्याने २००७ ला राजू शेट्टी यांच्यासोबत आलो. मात्र असे असले तरी आमचे चळवळीचे गुरू स्व.शरद जोशीच आहेत असेही तुपकर यावेळी म्हणाले. तुपकर यांनी आपल्या भाषणातून चळवळीच्या संघर्षाची कहाणी वाचली.
  राजू शेट्टींचा चेहरा आम्ही महाराष्ट्रात पोहचवला. आता आम्ही तुम्हाला जड वाटायला लागलो. माझी संघटनेतून तुम्ही हकालपट्टी करू शकता पण जनतेच्या मनातून रविकांत तुपकरांची हकालपट्टी करू शकत नाही. लोकसभा निवडणुकीत शेतकऱ्यांनीच राजू शेट्टींची हकालपट्टी केली असे तुपकर यावेळी म्हणाले. जालिंधर पाटलांनी आमच्या हकालपट्टीची घोषणा केली पण स्क्रिप्ट राजू शेट्टींनी लिहून दिली, त्यांनी आमच्यावर चांगले तोंडसुख घेतले आता तुम्ही अंगावर आले तर त्याला त्याच पद्धतीने उत्तर देऊ असे तुपकर म्हणाले.
ही काय हकालपट्टी संघटना आहे का?
ते म्हणतात रविकांत तुपकर यांना आम्ही मोठे केले. मग राजू शेट्टींना शरद जोशींनी मोठे केले, मात्र आमदारकीसाठी शरद जोशींना सोडले, मग सांगा कुणी कुणाशी गद्दारी केली असा सवाल रविकांत तुपकर यांनी केला. आता राजू शेट्टी आपल्याला ट्रोल करण्याच्या सूचना देतील, आता मी देखील सांगतो ते अंगावर आले तर त्यांना शिंगावर घ्या , जशाच तसे उत्तर द्या असे तुपकर कार्यकर्त्यांना उद्देशून म्हणाले. राजू शेट्टींनी अनेकांना बाजूला केले, ही काय हकालपट्टी संघटना आहे का? असा सवाल करीत रविकांत तुपकर स्वाभिमानी शेतकरी संघटनेतून बाजुला करण्यात आलेल्या नेत्यांची यादीच वाचून दाखवली. मी यांच्यातून गेलो नाही, यांनी मला बाजूला केले आता मला माझी भूमिका मांडावी लागेल असे तुपकर म्हणाले.माझ्यावर जर ते अजूनही आरोप करतील तर त्यांचं सगळच बाहेर काढील असा इशाराही तुपकर यांनी यावेळी दिला. ज्यांनी मला काढण्याची घोषणा केली त्या जालिंधर पाटलांनी देखील राजू शेट्टींच्या विरोधात विधानपरिषदेसाठी बंड केले होते, त्यांनी मीडियातून राजू शेट्टींवर आरोप केले, आता ते मला सांगतात की रविकांत तुपकर यांनी मीडियातून बोलू नये हा विरोधाभास नाही का? असा सवालही त्यांनी केला.
तुम्ही राजकीय महत्वकांक्षा बाळगली तर चालते आम्ही राजकीय महत्वकांक्षा बाळगली तर चूक? असेही ते राजू शेट्टींना उद्देशून म्हणाले. लोकसभा निवडणुकीत रविकांत तुपकर यांना पाठिंबा असल्याचे मीडियात सांगायचे आणि त्यांच्या लोकांना त्यांनी विरोधात काम करायला सांगितले असेही तुपकर म्हणाले..
राजू शेट्टींनी मला व्हिलन केले, सदाभाऊंना व्हीलन केले. माझ्यामुळे ओळख मिळाली असे शेट्टी सांगतात..मग आमच्यामुळे तुम्हाला ओळख मिळाली असे म्हटले तर चुकले कुठे? तुम्हालाही आम्ही महाराष्ट्रात ओळख मिळवून दिली असे तुपकर यावेळी म्हणाले. आम्हाला शेट्टींनी फिटवायच काम केले, आता ते म्हणतील सायबांवर आरोप करता मग तुम्ही परवा काशी केली ना..तुम्ही बोलले नसते तर मी बोललो नसतो,सुरूवात तुम्ही केली असेही तुपकर म्हणाले..
म्हणून बिल्ला ठेवला...
ते म्हणतात की रविकांत तुपकर यांनी मीडियातून राजू शेट्टींच्या आरोप केले. मग त्यांनीही मीडियातून पत्रकार परिषद घेऊन माझी हकालपट्टी केली, त्यांनी लेखी पत्र कुठे दिले? त्यामुळेच तर छातीवर बिल्ला कायम आहे असे तुपकर छातीवरील बिल्ला दाखवत म्हणाले. 
आता पुढे काय?
आता आपल्याला चळवळ पुढे न्यायची आहे. राजकीय भूमिका वेगळी आणि चळवळ याची गफलत होता कामा नये अशा सूचनाही तुपकर यांनी यावेळी केल्या. राजू शेट्टींनी माझी हकालपट्टी केली, त्यादिवशी त्यांना चांगली झोप लागली असेल असे तुपकर म्हणाले. वेळोवेळी भूमिका बदलणाऱ्या शेट्टींवर कोणती समिती नेमायचे? आमच्यावर लाठीचार्ज झाला तेव्हा शेट्टी ५० किलोमिटर अंतरावर होते, ते भेटायला आले नाही आता मला सांगा चूक कोणाची असा सवाल त्यांनी केला.भविष्यात आपल्याला मोठ काम उभ करायचं आहे. चळवळ आणि राजकीय भूमिका या दोन्ही गोष्टी वेगवेगळ्या आहेत. महाराष्ट्रात विधानसभेला २५ ठिकाणी निवडणूक लढवायची आपली तयारी आहे, त्यासाठी शेतकऱ्यांसाठी काम करणाऱ्या वेगवेगळ्या संघटना, चळवळींना सोबत घेऊन महाराष्ट्र क्रांतीकारी आघाडीची स्थापना करत असल्याची घोषणा त्यांनी केली.