भोंदूबाबाने महिलेला सांगितली 'तिथल्या' तिळाची कहानी; नंतर अश्लील व्हिडिओ पाठवून स्वतःचीच दिली ऑफर!

 
पुणे : एका भोंदूबाबाचा अजब कारनामा समोर आला आहे. तुझा संसार सुखाचा सुरू ठेवायचा असेल तर माझ्याशी संभोग कर, अशी मागणी भोंदूबाबाने विवाहितेकडे केली. विशेष म्हणजे विवाहितेच्या पतीने भोंदूबाबाची भेट घेऊन माझ्या पत्नीवर जादूटोणा करून तिला कंबरेखाली अपंग करा, अशी विकृत मागणी केली होती. त्यानंतर भोंदूबाबाने विवाहितेला फोन करून तुझ्या पतीला तुझं वाईट करायचंय. मी तुला यातून वाचवेल. त्यासाठी माझ्याशी संभोग कर, अशी मागणी केली. पीडित महिलेने पुणे पोलिसांत तक्रार दिली. त्यानंतर पोलिसांनी प्लॅन रचून भोंदू बाबाला अटक केली. विलास बापूराव पवार ऊर्फ महाराज (रा. पिळवंडी ता. पाटोदा, जि. बीड) असे या भोंदूबाबाचे नाव आहे.

पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, विवाहित महिला आणि तिच्या पतीत नेहमी भांडणं होत होती. या भांडणाला कंटाळून तिच्या पतीने बीड जिल्ह्यातील पिळवंडी येथे जाऊन भोंदूबाबा विलास पवारची भेट घेतली. माझ्या पत्नीला कमरेखाली अपंग करून जादूटोणा करा, अशी मागणी पतीने केली. स्वतः तीन-चार दिवस भोंदू बाबाजवळ राहिला. त्यानंतर बाबा विलासने पीडित महिलेला फोन करून तुझा पती माझ्याकडे आला होता, तुला कमरेपासून खाली अपंग करण्याचे त्याने मला सांगितले आहे.

मात्र मी तुला यातून वाचवू शकतो, असे सांगितले. त्यानंतर भोंदू बाबा महिलेला फोन करून जवळीक साधायचा प्रयत्न करू लागला. तुझ्या पोटात गाठी झाल्या आहेत. तुझे आयुष्य कमी राहिले आहे, अशी भीती दाखवली. मात्र यातून सुटण्यासाठी एक पर्याय आहे. ज्या पुरुषाच्या तळहातावर व विशिष्ट अवयावर तीळ आहे. त्याच्याशी शरीरसंबंध ठेव. तुमच्या घरात सुखशांती नांदेल, असे भोंदू बाबाने महिलेला सांगितले. काही वेळानंतर बाबाने स्वतःचा अश्लील व्हिडिओ काढला. त्यात तळहातावर व विशिष्ट अवयवावर तीळ असल्याचे दाखवत तो व्हिडिओ महिलेला पाठवला. त्यानंतर महिलेला फोन करून दुसऱ्या कुणाला शोधण्याऐवजी माझ्याशीच संबंध ठेव, अशी मागणी केली.

घाबरलेल्या महिलेने पोलिसांना याबाबत माहिती दिली. भोंदू बाबाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. त्यानंतर तुम्ही भोंदू बाबाला फोन करून पुण्यात बोलवा, असे पोलिसांनी महिलेला सांगितले. त्यानुसार महिलेने फोन करून भोंदू बाबाला भेटण्यासाठी पुण्यात बोलावले. पोलिसांनी डांगे चौकात सापळा रचून भोंदू बाबाला अटक केली. या प्रकरणात महिलेच्या पतीविरुद्धसुद्धा गुन्हा दाखल करण्यात येणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली.