लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये झाली प्रेग्नंट; तो म्हणाला, "हे काम' माझं नाही... वाचा प्रेमात कशी झाली फसवणूक
पोलीस सूत्रांच्या माहितीनुसार, पीडित तरुणीची राहुलसोबत फेसबुकवर ओळख झाली होती. तरुणी बडनेरा येथील एका महाविद्यालयात शिक्षण घेत असताना अमरावतीच्या गाडगेनगरमध्ये भाड्याने राहत होती. तिथे दोघांची प्रत्यक्ष भेट झाली. सततच्या भेटीने मैत्री दृढ झाली. बडनेरा येथील कॉलेज चांगले नाही असे म्हणत राहुलने तिला दुसऱ्या कॉलेजमध्ये प्रवेश घ्यायला सांगितला. त्यासाठी ३० हजार रुपये पीडित तरुणीच्या भावाकडून ऑनलाइन बोलावून घेतले. त्यानंतर दोघे एकमेकांच्या प्रेमात पडले.
एकाच खोलीत लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहू लागले. अमरावती शहरात खोली भाड्याने घेऊन आम्ही दोघे नवरा- बायको आहोत, अशी बतावणी राहुलने शेजाऱ्यांना केली. तू खोटे का सांगतोय असं जेव्हा तरुणीने राहुलला विचारलं तेव्हा राहुलने तिला मारहाण केली. राहुलने तिचे कॉलेजला जाणे देखील बंद केले. लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये असताना लग्न करण्याचे आमिष दाखवून तो रोज तिच्या शरीराचा उपभोग घेऊ लागला. त्यामुळे ती गर्भवती राहिली.
पीडित तरुणीच्या आईकडून कॉलेजचे शुल्क भरण्यासाठी ५० हजार रुपये सुद्धा राहुलने घेतले. मात्र शुल्क भरलेच नाही, असे तरुणीने तक्रारीत म्हटले आहे. आधी मदतीचे नाटक करून त्याने मैत्री केली. नंतर लग्नाच्या आणाभाका घेतल्या. शरीर संबंध ठेवले. त्यातून गर्भवती राहिल्यानंतर मात्र राहुलचे सूरच बदलले, असे तरुणीने पोलिसांना दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे. दोन वर्षांपासून हा सर्व प्रकार सुरू होता. तरुणी गर्भवती राहिल्यानंतर "तो मी नाहीच' अशी भूमिका राहुलने घेतली त्यामुळे पीडित तरुणीने १४ जानेवारी रोजी गाडगेनगर पोलीस ठाण्यात तक्रार दिली. राहुलविरुद्ध बलात्काराचा गुन्हा दाखल करून त्याला अटक करण्यात आली आहे.