ब्रेकअप टाळायचा? मग या सवयीपासून स्वतःला ठेवा दूर..

 
मुंबई : आपण ज्‍या व्यक्‍तीवर जिवापाड प्रेम करतो ती व्यक्‍ती आपल्याला सोडून जात असेल तर ते प्रचंड वेदनादायी असते. ही वेळ आपल्यावर येऊ नये म्‍हणून स्वतःल काही बदल आधीच करायचे असतात. तुमच्या काही सवयी तुमच्या जोडीदाराला आवडत नसतील तर तुमचे ब्रेकअप होण्याची शक्यता असते. त्यामुळे नाते तुटण्याच्या मार्गावर असेल तर काही सवयींना आळा घालून नातं आणखी घट्ट करता येऊ शकतं...
  • नात्यात एकमेकांची काळजी घेणे अतिशय महत्त्वाचं असतं. एकमेकांपासून दूर असले तरी फोन करून तब्येतीची, खाण्यापिण्याची चौकशी करणे महत्त्वाचे असते. मात्र धावपळीच्या जीवनात, ऑफिसच्या कामामुळे फोन करणं जमलं नाही, कामात व्यस्त असाल तर तो किंवा ती आपली काळजी करत नाही असं समजू नका. तुम्ही बिझी असल्याची कल्पना मेसेज करून तुमच्या जोडीदाराला द्या. तो आपल्याला इग्नोर करत आहे असं न समजता परिस्थिती समजून घ्या. बिझी असल्याची कल्पना जोडीदाराला दिली म्हणजे तुम्ही फोन किंवा मेसेज केला नाही तरी गैरसमज होणार नाही.
  • नात्यात एकमेकांची साथ महत्त्वाची असते. नातं नवीन असेल तर या नात्याला वेळेची आवश्यकता असतेच. एकमेकांना समजून घेण्यासाठी, आवडी निवडी कळण्यासाठी सोबत वेळ घालवणं आवश्यक असतं. स्पर्धेच्या या जगात आपलं नातं मागे पडू नये यासाठी एकमेकांना वेळ देण्याचा प्रयत्न करा. वेळ नसल्याने अनेक नाती तुटताना आपण पाहतोय. त्यामुळे जोडीदारासाठी थोडा वेळ नक्की काढा.
  • नात्यामध्ये पर्सनल स्पेस आवश्यक असतो. आपल्या जोडीदाराला त्याच्या आयुष्यात पर्सनल स्पेस मिळेल याची काळजी घ्या. तुम्हाला तिच्या किंवा त्याच्या गोष्टी माहीत असाव्या हे जरी खरे असले तरी जोडीदाराच्या प्रत्येक गोष्टीत नाक खूपसण्याचा प्रयत्न करू नका. तुम्ही तिचा किंवा त्याचा मेसेज, फोन, कॉल रेकॉर्डिंग चेक करत असाल तर ते चुकीचेच आहे. कारण नात्यात विश्वास असणं अतिशय महत्त्वाचे आहे.
  • मोबाइलसुद्धा तुमच्या ब्रेकअपचं कारण ठरू शकतं. जोडीदार तुमच्यासोबत असेल तर मोबाइलमध्ये डोकं खुपसू नका. ती किंवा तो तुमच्यासोबत आहे याचे भान ठेवा. नातं टिकवण्यासाठी मोबाइलला दूर ठेवा.