घर घेण्यासाठी गेलेल्या वकिलाला जात विचारली!; ३ बिल्‍डरांसह ६ जणांविरुद्ध ॲट्रॉसिटी

 
औरंगाबाद (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः हिरापूर (ता. औरंगाबाद) येथे रो हाऊस बुक करण्यासाठी गेलेल्या कुटुंबाला जात विचारण्यात आली. अनुसूचित जातीचे असल्याचे सांगितल्यानंतर तेथील कर्मचाऱ्यांनी घर दाखविण्यास टाळाटाळ केली. जातीवरून अपमानास्पद वागणूक दिल्यामुळे ॲड. महेंद्र गंडले यांच्या तक्रारीवरून भाईश्री ग्रुपचे मालक सोमानी, मकरंद देशपांडे, जैन, बांधकाम साईटवरील योगेश निमगुडे, सागर गायकवाड व इतर यांच्याविरुद्ध चिकलठाणा ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सिडको एन-२ येथील रहिवासी ॲड. गंडले हे ७ जानेवारीला पत्नी, मुलांसह हिरापूर येथे भाईश्री ग्रुपचे भूमी विश्वबन फेज दोन येथील रो-हाऊसची साईट बघण्यासाठी गेले. येथील रो हाऊस आवडल्यानंतर साईटवरील कर्मचारी सागर गायकवाड याने जात विचारली. ॲड. गंडले यांनी आम्ही जातीने बौद्ध (महार) असल्याचे सांगितले. त्यानंतर काही कारण सांगून गायकवाड तेथून निघून गेला. थोड्या वेळाने तो परत आल्यानंतर त्याने तुमच्या जातीच्या लोकांना या ठिकाणी घर देता येणार नाही, असे सांगितले.

ॲड. गंडले यांनी संबंधित बिल्डरचे कार्यालय गाठून त्याठिकाणी घराची चौकशी केली. त्या ठिकाणीही जात विचारण्यात आली. जातीची माहिती देताच घरे नसल्याचे उत्तर देण्यात आले. जातीवरून घरे नाकारल्याने आपल्या कुटुंबियांना फार वाईट वाटले. त्यानंतर चिकलठाणा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचा निर्णय घ्यावा लागला, असे ॲड. गंडले यांनी फिर्यादीत म्हटले आहे. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास पोलीस उपअधीक्षक करत आहेत.