वऱ्हाडी अक्षता टाकणार, तितक्यात तरुणी म्हणाली, थांबा...!
नागपूर ः लगीनघाई सुरू... वधू-वर सातफेरे घेण्याच्या तयारीत... सनईच्या सुरांनी वातावरण मंगलमय झालेले... वऱ्हाडी मंडळीही हातात अक्षता घेऊन तयार... तितक्याच एक तरुणी तिथे आली म्हणाली, थांबा...हे लग्न नाही होऊ शकत! हा एखाद्या चित्रपटातील सीन नाही तर प्रत्यक्षात नागपूरच्या खापरखेडा-कोराडी मार्गावरील शेतकरी सेलिब्रेशन लॉनमध्ये घडलेला प्रकार आहे... थांबा म्हणणारी दुसरी तिसरी कुणी नाही तर नवरदेवाची पहिली पत्नी होती... नवरदेव महाशय पहिलीला घटस्फोट न देताच बोहल्यावर चढण्याच्या तयारीत होते. मंडपातच पती-पत्नीत भांडण सुरू झाले आणि वर हा वधूला घेऊन पळून गेला. खापरखेडा पोलिसांनी पहिल्या पत्नीच्या तक्रारीवरून नवरदेवाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
आशिष अनिल भमोळे असे आरोपी नवरदेवाचे नाव आहे. अद्याप पहिल्या पत्नीपासून त्याचा न्यायालयातून घटस्फोट व्हायचा आहे. मात्र त्याने आधीच लग्नाचा घाट घातला. त्याचे पहिले लग्न मे २०१८ मध्ये कल्पनाशी (नाव बदलले आहे) झाले होते. काही महिने संसार सुखाने झाला. पण नंतर खटके उडून वाद वाढत गेला. तो इतका वाढला की दोघांनी वेगळे होण्याचा निर्णय घेतला. वर्षभरातच संसार तुटला. कल्पना माहेरी राहू लागली. आशिषने तिला घटस्फोटाची नोटीसही पाठवली. पण घटस्फोटाची केस सुरू असताना आशिषला आता लग्नाची घाई नडली आहे. अक्षता टाकण्याची तयारी सुरू असतानाच कल्पना तिच्या भावाला घेऊन लग्नात पोहोचली. तिने त्याच्या लग्नाचा व्हिडिओसुद्धा काढला.
तिने लग्न रोखल्यानंतर सारेच गोंधळून गेले. नंतर जेव्हा वऱ्हाडी मंडळीला कळले की कल्पना आशिषची पहिली बायको आहे तेव्हाच एकच खळबळ उडाली. नवरदेव आशिषसह विजय अनिल भमोळे, अनिल अखंड भमोळे, सुनील लखनदास भमोळे, रोशन सुनील भमोळे (सर्व रा. तांडा पेठ) यांनी कल्पनाशी भांडण केले. तिचा भाऊ रोहित कछाळे याला लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. तो गंभीर जखमी झाला आहे. मारहाण करून लग्नमंडपाबाहेर काढल्यानंतर कल्पनाने पोलीस ठाणे गाठले अाणि तक्रार दिली. पोलिसांनी नवरोबासह मारहाण करणाऱ्या सर्व मंडळीविरुद्ध गुन्हा दाखल केला. मात्र पोलीस लग्नमंडपात पोहोचेपर्यंत आशिष नव्या वधूला घेऊन पळूनही गेला होता.