कमालच केली... एका तिळाचे केले शंभर तुकडे!
अभिषेकच्या या कृतीची दखल घेत इंडिया बुक ऑफ रेकॉर्डमध्ये त्याची नोंद करण्यात आली आहे. अभिषेक सध्या नांदेड येथील एमजीएम कॉलेजमध्ये बॅचलर ऑफ फाईन आर्टच्या अंतिम वर्षाला आहे. मायक्रो आर्ट हा अभिषेकचा आवडीचा विषय. आतापर्यंत मोहरी, तांदूळ, सुपारी, खडू, पेन्सिल यावर अभिषेकने गणपतीचे चित्र रेखाटले आहे. याआधी तिळावर एबीसीडी, १ ते १० पर्यंतची अक्षरेही लिहिली आहेत. एक तीळ सात जणांनी वाटून खावा या म्हणीचा त्याने विचार केला.
सातच्या पुढे जाऊन एक तीळ शंभर जणांनी वाटून खाण्याची सोय अभिषेकने केली. अभिषेकने सूक्ष्म कलेत प्राविण्य मिळवले आहे. अतिशय हलाखीच्या परिस्थितीतून शिक्षण घेत या कलेच्या माध्यमातून कुटूंबांची जबाबदारी सांभाळत आहे. सूक्ष्म वस्तूवर त्याने रेखाटलेल्या गणपतीच्या विक्रीतून आतापर्यंत साडेतीन ते चार लाख रुपये त्याने कमावले आहेत. कला आनंददायी तर आहेच. शिवाय भाकरीचा प्रश्नसुद्धा मिटवते. त्यामुळे ती हजारो लोकापर्यंत पोहोचली पाहिजे, असे अभिषेक सांगतो.