उस्मानाबादच्या खेड्यात राष्ट्रपतींनंतर आता जन्मले पंतप्रधान!!

 
file photo

उस्मानाबाद ः काहीतरी वेगळं करण्याच्या नादात काही जण भलंतच काहीतरी करून बसतात. आता हेच पहा ना. उस्मानाबाद जिल्ह्यात काय घडलंय ते... उमरगा तालुक्यातील चिंचोली गावात आधी राष्ट्रपती तर राहतच होते. पण आता पंतप्रधानही राहायला आले आहेत... तुम्‍ही म्‍हणाल काय पण "फेकू' नका...  पण खरंच... दत्ता चौधरी नावाच्या ग्रामस्‍थाच्या घरात दुसऱ्या मुलाचा जन्‍म झाला असून, त्‍यांनी या मुलाचे नाव पंतप्रधान ठेवले आहे. त्‍यांच्‍या पहिल्या मुलाचे राष्ट्रपती आहे! आता बोला!!

आता चौधरींच्या घरात एकाचवेळी राष्ट्रपती अन्‌ पंतप्रधान बागडताना दिसतील. अभिनेत्र्या, अभिनेत्‍यांची नावे देण्याची पद्धत आपल्याकडे आधीपासूनच आहे. पण तरीही अशाप्रकारची नावं आपल्या मुलांना देण्याचं कुणाच्या कधी मनातही आलं नसेल. चौधरींच्या डोक्‍यात ही कल्पना आली कशी, याबद्दल विचारले असता ते म्‍हणाले, की यामुळे मुलांच्या कर्तृत्‍वावर फरक पडेल. त्‍यांना चांगले संस्कार करून, शिकवून नावाप्रमाणे बनवणार असल्याचे ते म्‍हणाले. त्‍यांची पत्‍नी कविता हीसुद्धा या अजब नावांना समर्थनच देते, हे विशेष. हटके नाव ठेवण्याची ही पद्धत संपूर्ण जिल्ह्यात चर्चेची आहे. चौधरी कुटुंबालाही आता अवघा जिल्हा ओळखू लागला आहे.