प्रेमविवाह केल्यानंतर तरुण-तरुणीचा वेगळाच धंदा!

घरखर्च भागविण्यासाठी मोबाइल चोरी करायचे.., औरंगाबादची घटना
 
औरंगाबाद (लाइव्ह औरंगाबाद वृत्तसेवा) ः प्रेमविवाह केल्यानंतर घरखर्च भागविण्यासाठी चक्क युगुलाने मोबाइल चोरीचा धंदा उघडला. पायी जाणारे, दुचाकीवर जाणाऱ्यांचे मोबाइल हिसकावून हे युगुल दुचाकीवरून धूम ठोकायचे. वेदांतनगर भागात अशाप्रकारच्या घटना वाढत असल्याने पोलीसही हैराण होते. रेकॉर्डवरील गुन्हेगारही या चोऱ्यांबद्दल माहीत नसल्याचे सांगत असल्याने पोलीस चक्रावून गेले होते. अखेर चोरट्यांना पकडण्यासाठी पोलिसांनी साध्या वेशात गस्त घालायला सुरुवात केली आणि हे युगुल हाती लागले.

२१ वर्षीय सुदर्शन दत्तात्रय गायके हा कन्‍नड तालुक्‍यातील बहिरगावचा असून, सध्या कांचनवाडीत राहतो. अभियांत्रिकीच्या तृतीय वर्षात तो शिकतो. ६ डिसेंबरला तो आणि त्‍याचे मामा पंढरीनाथ फाळके कपडे घेण्यासाठी सायंकाळी सातच्या सुमारास पैठण गेटवर गेले होते. रात्री सव्वा दहाला ते रेल्वे स्‍टेशन रोडने दुचाकीने कांचनवाडीकडे येत होते. सुदर्शन दुचाकीवर मागे बसलेला होता व मोबाइल पाहत होता. पंचवटी चौकातून जात असताना अचानक मागून आलेल्या दुचाकीवरील मुलीने त्याच्या हातातून माेबाइल हिसकावला.

पद्‌मपुरा राममंदिराच्या विरुध्द बाजूला भररस्त्यात हा प्रकार घडल्याने एक क्षण सुदर्शनही काही सूचले नाही. त्‍यानंतर मामा भाचाने आरडाओरड सुरू केली. त्‍याचवेळी तिथून जाणाऱ्या पोलिसांनी त्‍यांच्‍याकडे धाव घेतली व काय झाले असे विचारले. त्‍यावर घडलेला प्रकार सुदर्शनने त्‍यांना सांगितला. पोलिसांनी लगेच त्‍या दुचाकीचा पाठलाग सुरू केला. तक्रार करण्यासाठी सुदर्शन मामासह वेदांतनगर पोलीस ठाण्यात आला. तोपर्यंत पोलिसांनी पल्सर गाडीसह एका मुला-मुलीला पकडून पोलीस ठाण्यात आणले.

ऋषिकेश रमेश रोडे(२१) आणि मानसी ऋषिकेश रोडे (१८, रा. नारायणगाव, ता. पैठण) अशी मोबाइल चोर जोडप्याची नावे असल्याचे समोर आले. ऋषिकेश आणि मानसी या दोघांचा नुकताच प्रेमविवाह झाला होता. घरखर्च भागविण्यासह पैसे कमावणे आणि मौजमजेसाठी त्‍या दोघांनी हा चोरीचा मार्ग स्वीकारल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे. पोलिसांना या दोघांना तीन ते चार किलोमीटर पाठलाग करून देवगिरी कॉलेज रस्त्यावर पकडले. तपास सहायक पोलीस निरिक्षक श्री. कंकाळ करत आहेत.