विवाहित इंजिनिअर युवतीला ब्लॅकमेल करून दोन वर्षे लैंगिक शोषण!; कोल्ड्रिंक्समधून द्यायचा बेशुद्ध होण्याचे औषध; व्हिडिओही बनवले!!

 
नागपूर : विवाहित इंजिनिअर युवतीला ब्लॅकमेल करून तब्बल दोन वर्षे तिचे लैंगिक शोषण करण्यात आल्याचा प्रकार नागपुरात समोर आला आहे. त्रासाला कंटाळून युवतीने अखेर पोलिसांत धाव घेऊन आपबिती कथन केली. पोलिसांनी आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

कुणाल दादाराव इंगळे असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपीचे नाव आहे. पोलीस सूत्रांच्या माहितीनुसार, पीडित ३१ वर्षीय युवती विवाहित असून, इंजिनिअर आहे. २०१६ मध्ये नोकरीच्या निमित्ताने मुलाखत देण्यासाठी ती भोपाळला गेली होती. तिथेच मुलाखतीसाठी कुणालसुद्धा आला होता. तिथे दोघांची ओळख झाली. मीही इंजिनिअर आहे, असे कुणालने तिला सांगितले. दोघांनी एकमेकांना आपले मोबाइल नंबर दिले होते. त्यामुळे दोघांचे अनेकदा मोबाइलवर बोलणे होत होते.

२६ जानेवारी २०१९ रोजी पीडित युवती हैदराबादला एका कंपनीत मुलाखात देण्यासाठी गेली होती. तिथेही कुणाल मुलाखत देण्यासाठी आला होता. दोघे मुक्कामासाठी एकाच हॉटेलमध्ये थांबले. दरम्यान रात्री कुणालने कोल्ड्रिंक्समध्ये बेशुद्ध होण्याचे औषध टाकून तिला पाजले. त्यामुळे ती बेशुद्ध झाली. त्यानंतर कुणालने रात्रभर तिच्याशी शारीरिक संबंध ठेवले. या संबंधांची व्हिडिओ क्लिपसुद्धा त्याने बनविली. ती व्हिडिओ क्लिप तिच्या पतीला व आजोबाला दाखविण्याची धमकी देत शांत राहायला सांगितले.

बदनामीच्या भीतीपोटी तिने कुणालाही याबद्दल सांगितले नाही. त्‍यानंतर कुणाल वारंवार नागपूरला येऊन तिचे लैंगिक शोषण करू लागला. काही दिवसांपूर्वी पीडित युवतीच्या पतीला दिल्ली येथे नोकरी लागल्याने तिचा पती दिल्लीला गेला. त्यामुळे कुणालला रानच मोकळे झाले. त्याने तिला नागपुरातील अनेक हॉटेलमध्ये नेले तिथे तिचे शारीरिक शोषण केले. हवालदिल झालेल्या युवतीच्या मानसिक स्थितीचा फायदा घेत तो तिच्याकडे पैसे मागू लागला. त्याने युवतीकडून जवळपास अडीच लाख रुपये लुटले. हा त्रास सतत वाढत जात असल्याने अखेर पीडित युवतीने मंगळवारी हुडकेश्वर पोलीस ठाण्यात तक्रार दिली. तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल केला.