हिला बायको म्हणायचं की आणखी काही... लग्न झाल्यावरही अफेअर सुरूच, प्रियकरासोबत मिळून पतीविरुद्ध रचला कट!; बिंग फुटल्यावर वाचा काय केले...
प्रकाशनगरातील पश्चिम गल्ली क्रमांक ४ मध्ये राहणाऱ्या ४८ वर्षीय महिलेने या प्रकरणात तक्रार दिली आहे. त्या मुलगा आणि पतीसह राहतात. त्यांची सून सध्या दौलताबाद येथे माहेरी राहते. पती जालन्यातील कंपनीत काम करतात. मुलगा एका शाळेवर अकाऊंटंट आहे. त्यांच्या मुलाचे लग्न २०१६ मध्ये दौलताबाद येथील वर्षा (नाव बदलले आहे) हिच्यासोबत झाले होते. आठ- नऊ महिन्यांपूर्वी वर्षा नेहमी मोबाइलवर कोणासोबत तरी बोलत होती.
सासूने कोणाशी बोलतेय हे वारंवार विचारूनही तिने सांगितले नाही. त्यानंतर वर्षाला एका मुलासोबत बोलताना तिच्या पतीनेच पकडले. त्यानंतर तिच्याजवळ असलेला मोबाइल पतीने घेऊन टाकला. नंतर पतीने विश्वासात घेऊन तिला विचारले, की कोणासोबत बोलत होती. त्यावेळी तिने सांगितले होते की शुभम तोरणमल याच्याशी बोलत आहे. त्याच्याशी यापुढे कधीच बोलणार नाही, असे तिने पतीला सांगितले. त्यानंतर तिला मोबाइल देण्यात आला. काही दिवस ती व्यवस्थित राहिली. नंतर पुन्हा तिला दोन ते तीन वेळेस परत त्याच मुलाशी मोबाइलवर बोलताना पकडण्यात आले.
यावेळी तिने सर्वांसमोर सांगितले की यापुढे असे करणार नाही. त्यानंतर एप्रिल-मे २०२१ मध्ये सासूचे फोटो कुठल्या तरी माणसांसोबत जोडून व्हाॅट्स ॲपवर ९७६३८०४६२२ या क्रमांकावरून नातेवाइकांत व्हायरल करण्यात आले होते. सून वर्षानेच सासूचे हे फोटो कुणाला तरी पाठवले होते, हे लक्षात आले, पण पुरावा नसल्याने पती, सासू, सासऱ्यांनी हे प्रकरण तिथेच संपवले. मात्र सुनेचे प्रताप एवढ्यावरच थांबले नाही. त्यानंतर २८ डिसेंबर २०२१ रोजी दुपारी अडीचला व्हॉट्स ॲपवर महिलेच्या मुलाचा व एका मुलीचा फोटो असलेला फोटो ९९६०८२०२५० या क्रमांकावरून आला होता. तो महिलेला मुलाने दाखवला. वर्षानेच हे कारस्थान केल्याचे महिलेच्या आणि त्यांच्या मुलाच्या लक्षात आले. दुसऱ्याच दिवशी त्या मुलासह मुकुंदवाडी पोलीस ठाण्यात तक्रार देण्यासाठी निघाल्या.
तेव्हा कागदपत्रे घरी विसरल्यामुळे परत ते घरी आले. घरी आल्यानंतर त्यांना वर्षा मोबाइलवर कोणाशीतरी बोलताना दिसली. ती प्रियकराला सांगत होती, की माझ्या नवऱ्याला बोलले, त्याच्याशी वाद घातले... महिलेने व त्यांच्या मुलाने तिला रंगेहात पकडले. तिच्याकडे मोबाइल कसा काय आला, तिला कुणी दिला, हे विचारत असतानाच बिंग फुटल्याने ती बाथरूममध्ये गेली आणि क्लिनिंग ॲसिड पिले. तिला उलटी होऊ लागल्याने हॉस्पिटलमध्ये भरती करण्यात आले. तेव्हापासून ती दौलताबाद येथे माहेरीच राहत आहे. वर्षाच्या पतीने तिच्याकडून जप्त केलेला मोबाइल आणि त्यातील सीमकार्डबद्दल माहिती काढली असता नंबर शुभम तोरणमल याच्या नावावर असल्याचे समोर आले. ज्या नंबरवरून महिलेचे फोटो व्हायरल झाले होते, तो नंबरही शुभम तोरणमलचाच असल्याचे निष्पन्न झाले. सून वर्षाच्या सांगण्यावरून शुभमनेच पती व सासूची बदनामी करण्याच्या उद्देशाने हे कारस्थान रचल्याचे समोर आल्याने सासूने पोलिसांत तक्रार दिली. सुनेचे कारनामे ऐकून पोलीस सुद्धा हादरून गेले आहेत.