सासू नातवाला शिकवत होती, आईचा गळा कसा कापायचा!; नवरा घ्यायचा चारित्र्यावर संशय; विवाहितेची तक्रार
सौ. उर्मिला विनोद धोत्रे (२५, साखरवाडी, ता. फलटण, जि. सातारा) या विवाहितेने याप्रकरणाची तक्रार दिली. तिचे लग्न २०१९ विनोद धोत्रे याच्याशी झाले होते. लग्नानंतर लग्न व्यवस्थित करून दिले नाही. डिजे लावून दिला नाही, असे म्हणत पाचव्याच दिवशी तिला मारहाण करण्यात आली. बाळंतीण झाल्यानंतर सर्व खर्च हा माहेरच्या लोकांनी केला. बाळंतपणानंतर सव्वा महिन्यातच तिला पुन्हा सासरी आणण्यात आले. त्यानंतर छोट्या छोट्या कारणांवरून तिला खोलीत डांबून सासरचे मारहाण करत होते. नवरा विनोद तिला मोबाइलमधील सुंदर मुलींचे फोटो दाखवायचा व मी दुसऱ्या सुंदर मुलीशी लग्न करणार आहे, असे म्हणायचा. तुला लग्नाआधी कोणकोणते स्थळ आले होते अशी विचारणा तो करत होता.
आधी आलेल्या स्थळांचे फोटो फेसबुकवर दाखवायला लावत होता अन् नंतर वारंवार चारित्र्यावर संशय घेत होता. मला कोणाचाही फोन येत नाही अन् मी कुणालाही फोन करीत नाही, असे उर्मिला वारंवार सांगत होती. मात्र त्यावर नवऱ्याचा विश्वास नव्हता. नवऱ्याने मारहाण करून पत्नीला माहेरी सोडले. त्यानंतर तिने सातारा येथील भरोसा सेल मध्ये तक्रार दिली. तिथे समुपदेशन झाल्यानंतर आता मी तिच्या चारित्र्यावर संशय घेणार नाही, असे त्याने लिहून दिले. त्यामुळे ती सासरी गेली. मात्र तरीही त्याच्या वागण्यात बदल झाला नसल्याचे तिने तक्रारीत म्हटले आहे. सासू ,सासरे, दीर व पतीने पुन्हा छळ करण्यास सुरुवात केली. तिला खोलीत कोंडून मारहाण करण्यात आली.
सासू २ वर्षीय नातवाला आईचा गळा कसा चिरायचा, तिला चपलेने बुटाने कसे मारायचे हे शिकवत होती, असे तिने तक्रारीत म्हटले आहे. अखेर छळ असह्य झाल्याने ती माहेरी गेली. नातेवाइकांनी मध्यस्थी करूनही समजोता न झाल्याने तिने ३ फेब्रुवारी रोजी पोलीस ठाण्यात तक्रार दिली. तक्रारीवरून पोलिसांनी पतीसह, सासु - सासरे व दिराविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.