ती काळी रात्र! काळा चहा, २० नारळ अन् ... गुप्तधनाच्या लालसेपोटी झाली एकाच कुटुंबातील ९ जणांची हत्या..! "त्या" खोलीत दिडवर्षांपासून कुणालाही नव्हता प्रवेश..! वाचा संपूर्ण हॉरर स्टोरी..!

 
सांगली( लाइव्ह ग्रुप नेटवर्क): राज्यातले सगळे राजकारणी त्या दिवशी मुंबईत.. विधानपरिषद निवडणुकीची धामधूम सुरु होती तर एकनाथ शिंदे गटाची सुरतला पळून जाण्याची प्लॅनिंग सुरू होती. सगळ्या मीडिया चॅनेलवर निवडणुकीचे कव्हरेज सुरू असताना सगळ्या यंत्रणेला हादरा बसवणारी बातमी सांगली जिल्ह्यातील मिरज तालुक्यातून धडकली होती. दोन सख्या भावंडांच्या घरात कुटुंबातील सगळ्यांचे म्हणजेच ९ जणांचे मृतदेह सापडले होते . संपूर्ण सांगली जिल्हाच नव्हे तर अख्खा महाराष्ट्र या बातमीने हादरला होता. सावकारी कर्जापोटी वणमोरे कुटुंबाने सामूहिक आत्महत्या केल्याचे तेव्हा सांगितल्या गेले..मात्र आता या प्रकाराला धक्कादायक वळण मिळाले असून गुप्तधन मिळविण्याच्या लालसेपोटी विष पाजून ९ जणांची हत्या करण्यात आल्याचे उघड झाल्याने खळबळ उडाली आहे. या तपासात ज्या बाबी उघड झाल्या आहेत त्यामुळे परिसरात राहणारे नागरिक प्रचंड घाबरले आहेत..

दीड वर्षापासून त्या खोलीत कुणालाच नव्हता प्रवेश..!

माणिक वनमोरे आणि पोपट वनमोरे या दोन भावंडांचे हे कुटुंब. माणिक वनमोरे हे व्यवसायाने पशुवैद्यकीय डॉक्टर तर पोपट वनमोरे हे शिक्षक होते. दोघेही मिरज तालुक्यातील म्हैसाळ येथे वेगवेगळ्या घरात राहत होते. दीड वर्षाआधी पोपट वनमोरे यांचा मुलगा शुभम याच्या खोलीत गुप्तधन असल्याचे वनमोरे कुटुंबियांना कळाले होते. त्यामुळे हे गुप्तधन काढण्यासाठी सोलापूर येथील एका मांत्रिकाला हाताशी धरण्यात आले होते. शुभमच्या खोलीत कुटुंबातील व्यक्तिव्यतिरिक्त व मंत्रिकाव्यतिरिक्त इतर कुणालाही प्रवेश नव्हता. दीड महिन्याआधी शुभम चे मामा योगेश सातपुते त्यांच्या घरी आले होते. तेव्हा ते शुभमच्या खोलीत जात होते मात्र तेवढ्यात शुभम मामावर जोरात ओरडला होता. काही दिवसांत आमचे काम होणार आहे असे शुभम त्यावेळी मामाला म्हणाला होता. त्यामुळे तेव्हाच खोलीत काहीतरी गुप्तधनाचा प्रकार सुरू असावा असा संशय शुभमच्या मामाला आला होता..!

घटनेच्या आदल्या दिवशी दुकानातून आणले २० नारळ..!

दरम्यान हे गुप्तधन काढण्यासाठी वणमोरे कुटूंबीय तंत्र मंत्राचा सहारा घेत होते. सोलापूरचा अब्बास मोहमद अली (४२) हा मांत्रिक त्यांच्या संपर्कात होता. तो सांगेल तसे करायचे असे या कुटुंबाचे ठरलेले होते. घटनेच्या आदल्या दिवशी दुकानातून पोपट वनमोरे यांनी २० नारळ आणले होते. मात्र या २० नारळाचे  काय केले हे तेव्हा समोर आले नव्हते. ९ जणांचे मृतदेह सापडल्यानंतर वेगवेगळ्या चर्चा परिसरात सुरू होत्या. त्यातच किराणा दुकानातून आणलेल्या २० नारळाची गोष्ट समोर आल्यावर हा गुप्तधनाचा प्रकार असावा असा संशय पोलिसांना आला.

ती काळी रात्र अन् हादरवणारी पहाट ...

१९ जूनच्या मध्यरात्री १२ वाजता मांत्रिक अब्बास वनमोरे कुटुंबियांच्या घरी आला. दुकानातून आणलेले २० नारळ शुभमच्या खोलीमध्ये असलेल्या दरवाजाजवळ पुरण्यात आले. त्यानंतर सगळ्यांनी काळा चहा पिला..या काळ्या चहातच मांत्रीकाने विष कालवून वनमोरे कुटुंबातील सगळ्यांची हत्या घडवून आणल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. दरम्यान पोलिसांनी अब्बास आणि त्याचा साथीदार धीरज सूरवशे(३०, सोलापूर) या दोघांनाही अटक केली आहे. या सगळ्या प्रकारामुळे म्हैसाळ परिसरात सध्या भीतीचे वातावरण आहे. लहान मुले , महिला सध्या अंधार झाल्यावर घराबाहेर यायलाही घाबरत आहेत..!