State News : धक्कादायक..! काम देण्याचे आमिष दाखवून महिलेला खोलीत डांबले!; मुलादेखत दोन महिने दोघांचा आळीपाळीने बलात्कार

 
औरंगाबाद : दोन महिने महिलेला अन् तिच्या मुलाला खोलीत डांबून ठेवून तिच्या मुलादेखत तिच्यावर दोघांनी आळीपाळीने बलात्कार केल्याची धक्कादायक घटना औरंगाबादमध्ये समोर आली आहे. याप्रकरणी औरंगाबादच्या मुकुंदवाडी पोलीस ठाण्यात पीडित महिलेच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला असून, एका आरोपीला अटक करण्यात आली आहे. संभाजी आसाराम शिंदे असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.

पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, एका महिलेला व तिच्या मुलाला संभाजी शिंदे याने कंपनीत काम देण्याचे आमिष दाखवले होते. २६ नोव्हेंबर २०१९ रोजी मुकुंदवाडी भागातील रेल्वे गेट नंबर ५६ येथे महिलेला बोलावून घेतले होते. तेव्हा संभाजी शिंदेने महिलेला व तिच्या मुलाला रिक्षामध्ये बसवून त्या दिवशी शेंद्रा एमआयडीसी मधील एका कंपनीत काम दिले.

संध्याकाळी काम संपल्यानंतर महिलेला व मुलाला घरी सोडतो म्हणून स्वतःच्या गाडीत बसवले. मात्र गाडी घरी न नेता क्रांती चौक परिसरातील एका खोलीजवळ नेली. त्यानंतर एका खोलीत महिलेला तर दुसऱ्या खोलीमध्ये तिच्या १४ वर्षीय मुलाला डांबून ठेवले. महिलेवर शिंदे व त्याच्या एका मित्राने दोन महिने आळीपाळीने मुलादेखत बलात्कार केला. कशीबशी मुलाने व  महिलेने शिंदे याच्या तावडीतून सुटका करून घेतली. त्यानंतर मुकुंदवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी शिंदे याला अटक केली असून त्याच्या साथीदाराचा शोध सुरू आहे.