State News : धक्कादायक..! नागपूरच्या तरुणीचे अपहरण करून राजस्थानमध्ये विकले! अनेकांच्या लैंगिक अत्याचाराची झाली शिकार!!, इन्स्टाग्रामच्या मदतीने अशी झाली सुटका

 
नागपूर : १९ वर्षीय तरुणीचे अपहरण करून तिला राजस्थानात नेण्यात आले. तिथे तिला दलालाला विकले. दलाल आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी तिच्या शरीराचा उपभोग घेतला. त्यानंतर जवळपास साडेसात लाख रुपये घेऊन तिचे दोनदा लग्न लावून देण्यात आले. तरुणीने संधी साधत नवऱ्याचा मोबाइल घेत इन्स्टाग्रामवरून मित्राला व्हॉइस मेसेज पाठवत आपबिती सांगितली. त्यानंतर पोलिसांनी राजस्थानात जाऊन पीडित तरुणीची सुटका करून ४ आरोपींना अटक केली.

पोलीस सूत्रांच्या माहितीनुसार, नागपुरातील पांचपावली पोलीस ठाण्यात २६ डिसेंबर रोजी १९ वर्षीय तरुणी बेपत्ता झाल्याची नोंद करण्यात आली होती. पोलिसांना शोध घेऊनही ती मिळून आली नव्हती. दरम्यान तिने मित्राला इन्स्टाग्रामवरून व्हॉइस मेसेज पाठविल्यानंतर पोलिसांनी मोबाईल लोकेशनवरून राजस्थानातील रिगंस येथील पुरोहित बास भागातून तिची सुटका केली. तिने पोलिसांना घडलेला घटनाक्रम सांगितल्यानंतर पोलीसही चक्रावले.

नागपुरातील अन्नू खान व सलमान खान या दोघांनी नागपुरातून तिचे अपहरण केले. तिला राजस्थानातील जयपूर येथे नेण्यात आले. तिथे दलाल गीता हिच्याकडे तिला सोपविण्यात आले. दलाल गीताने तरुणीला तिचा साथीदार अशोक शर्माच्या ताब्यात  दिले. अशोक शर्माने तिच्यावर बलात्कार केला. त्यानंतर राजस्थानातील सिकर जिल्ह्यातील लाडखानी येथील संजयकडून २ लाख ६० हजार रुपये घेत त्याच्याशी तरुणीचे लग्न लावून दिले. दरम्यान संजयकडून होणाऱ्या छळाला कंटाळून तिने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे संजयने तरुणीला पुन्हा एकदा दलाल अशोक शर्माच्या ताब्यात दिले. त्यानंतर अशोक शर्माने रिंगस येथील पुरोहित बासच्या मुकेशसोबत ५ लाख रुपयांत तरुणीचा सौदा केला. त्यानंतर तरुणी मुकेशसोबत राहत होती.

दरम्यान संधी साधत तिने मुकेशचा मोबाइल घेत इन्स्टाग्रामवरून मित्राला ऑडिओ मेसेज करत आपबिती सांगितली. मित्राने ही माहिती पोलिसांना दिली. पोलिसांनी लोकेशनच्या आधारे पुरोहित बास येथून मुकेशच्या ताब्यातून तिची सुटका केली. पोलिसांनी आतापर्यंत या प्रकरणात नागपूरवरून तिचे अपहरण करणाऱ्या अन्नू खान व सलमान खान तसेच मुकेशला अटक केली आहे. याशिवाय तरुणी राजस्थानात असताना तिच्यावर वेळोवेळी बलात्कार करणाऱ्या विजय, सागर आणि तिचा २ लाख ६० हजार रुपयांत ज्याच्याशी तिचे लग्न लावले होते अशा संजय नावाच्या व्यक्तीला अटक केली आहे. दलाल गीता आणि अशोक शर्मा फरारी आहेत.