State News देवेंद्र फडणवीसांचा शरद पवारांवर निशाणा! १४ एप्रिल ला १४ ट्विट; म्हणाले बाबासाहेबांच्या भारतात "हे" स्वीकारार्ह नाहीच !
डॉ बाबासाहेब आंबेडकर जम्मू काश्मीरला विशेष दर्जा देणाऱ्या कलम ३७० च्या विरोधात होते . मात्र याबद्दल पवारांची भूमिका पहा असे म्हणत फडणवीस यांनी पवारांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. काश्मिर फाईल्स चित्रपटाबद्दल शरद पवारांनी केलेल्या विधानाचा सुद्धा फडणवीस यांनी खरपूस समाचार घेतला. नवाब मलिक यांना अटक झाल्यानंतर ते मुस्लिम आहेत म्हणून त्यांना लक्ष केले जातेय व त्यांचा संबंध दाऊदशी जोडला जातोय असे विधान पवारांनी केले होते या विधानाचे सुद्धा फडणवीसांनी स्मरण करून दिले.
इशरत जहाँसाठी राष्ट्रवादीच्या वरिष्ठ नेत्यांनी मदत केली होती. २०१२ मध्ये आझाद मैदानात हिंसाचार झाला मात्र त्यावेळी गृहखाते राष्ट्रवादीकडे असल्याने हिंसाचार करणाऱ्या रझा अकादमीवर कारवाई करण्यात आली नाही याचा उल्लेखही फडणीवसांनी केला आहे. भारतीय संविधानात धर्माच्या आधारावर आरक्षणाला विरोध असतांना पवारांनी मुस्लिम आरक्षणासाठी सातत्याने पुढाकार का घेतला सवाल उपस्थित केला आहे. अल्संख्यांक समाज कोणाचाही पराभव करु शकतो या पवारांच्या विधानाचे फडणवीसांनी स्मरण करून दिले.
हिंदू दहशतवाद हा शब्दप्रयोग सर्वप्रथम कुणी केला असा प्रश्न देवेंद फडणवीस यांनी उपस्थित केला आहे. सच्चर समितीचा अहवाल लागू करण्यासाठी पवारांनी केलेल्या मागणीचा उल्लेख सुद्धा फडणवीस यांनी ट्विट मध्ये केला आहे. मुंबईत बॉम्बस्फोट झाले तेव्हा १३ वा बॉम्बस्फोट मुस्लिम वस्तीत झाला असा शोध पवारांनी लावला. कायदा आणि सुव्यवस्था सांभाळऐवजी पवारांनी तुष्टीकरणाला प्राधान्य दिले असा घणाघात फडणवीसांनी केला.
काश्मिर फाईल्स चित्रपटात काश्मिरी पंडितांच्या वेदना दाखविल्या मात्र तरीही तो चित्रपट पवारांना अस्वस्थ का करतो ? तुमच्या ढोंगी धर्म निरपेक्षतेच्या अजेंड्याला धक्का बसेल म्हणून ? असा प्रश्न फडणवीस यांनी शरद पवारांना विचारला आहे. काश्मिर फाईल्स हा चित्रपट कोणत्याही धर्माच्या विरोधात नाही. केवळ अनुनयाच्या हेतूनेच जातीय विद्वेष पसरविण्याचा हा प्रयत्न का असा सवालही फडणवीस यांनी पवारांना विचारला आहे. डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या भारतात हे स्वीकारार्ह नाही असेही फडणवीसांनी म्हटले आहे.