धक्कादायक..! रो हाऊसमध्ये सुरू होता देहविक्रीचा व्यवसाय!!; नोकरी,पैशांचे आमिष दाखवून राजस्थान, यूपीतून आणल्या होत्या ६ मुली
नवीन पनवेल सेक्टर -७ मधील रो हाऊसमध्ये मुलींना देहविक्रीच्या व्यवसायासाठी आणण्यात आल्याची माहिती गोपनीय सूत्रांकडून स्थानिक गुन्हे शाखेला मिळाली होती. त्यानुसार एलसीबीप्रमुख पराग सोनवणे व त्यांच्या पथकाने एक बनावट ग्राहक पाठवला. बनावट ग्राहकाने मुलींना रो हाऊसमध्ये ठेवणाऱ्या दलालाशी संपर्क केला व मुलींची मागणी केली. तीन हजार रुपये घेऊन दलालाने बनावट ग्राहकाला रो हाऊसवर पाठवून दिले.
त्यानंतर एलसीबी आणि अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाच्या पथकाने छापा टाकला. यावेळी दोन अल्पवयीन मुलींसह ६ मुलींची सुटका करण्यात आली. परराज्यातून मुलींना मुंबईत आणणाऱ्या दलालांना सुद्धा अटक करण्यात आली. सुटका केलेल्या मुली राजस्थान आणि उत्तरप्रदेशातून आणल्याचे दलालांनी पोलिसांना चौकशीत सांगितले. देहविक्रीचा व्यवसाय करण्यासाठी रो हाऊस दलालांनी भाड्याने घेतल्याचेही समोर आले आहे. एका ग्राहकाकडून तीन हजार घ्यायचे अन् त्यातील एक हजार मुलीला तर दोन हजार स्वतःकडे ठेवायचे, असा प्रकार हे दलाल करीत होते, असेही तपासात समोर आले आहे.