धक्कादायक! एकतर्फी प्रेमातून दहावीच्या विद्यार्थिनीवर वर्गात शिरून सपासप चाकूचे वार!!

 
पुणे : दहावीच्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ सुरू असताना एक तरुणाने अचानक वर्गात शिरला आणि शिक्षक व विद्यार्थ्यांदेखत १५ वर्षीय विद्यार्थिनीवर चाकूचे सपासप वार केले. त्यानंतर तरुणाने पळ काढत स्वतः विष प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला. सध्या दोघांवर उपचार सुरू आहेत. पुण्यातील येरवडा भागात १४ मार्चला सकाळी ११ वाजता ही घटना घडली.

पोलीस सूत्रांच्या माहितीनुसार, जखमी विद्यार्थिनी वडगाव शेरी येथील शाळेत दहावीत शिकते. कपिल भट (२०, रा. धनलक्ष्मी सोसायटी, वडगाव शेरी) असे हल्लेखोर तरुणाचे नाव असून, त्‍याच्याविरुद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. १४ मार्चला दहावीच्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ सुरू असताना कपिल अचानक वर्गात शिरला. त्याने मुलीच्या पोटावर आणि पाठीवर चाकूने सपासप वार केले.

अचानक घडलेल्या या प्रकारामुळे सर्वच गोंधळून गेले. हल्ला केल्यानंतर कपिलने लगेच पळ काढला. त्‍यामुळे कुणाच्या हाती लागला आहे. हल्ल्यात गंभीर जखमी मुलीला तातडीने उपचारासाठी नेण्यात आले. पळ काढल्यानंतर कपिलनेदेखील विष प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला. सध्या मुलीवर आणि हल्लेखोरावर उपचार सुरू आहेत. एकतर्फी प्रेमातून कपिलने हल्ला केल्याची चर्चा आहे.