धक्कादायक! डॉक्टर नवऱ्याने केला बायकोचा खून;कारण...! देऊळगाव साकर्षा जवळील घटना

 
अकोला(लाइव्ह ग्रुप नेटवर्क): डॉक्टर नवऱ्याने बायकोचा गळा आवळून खून केल्याचा धक्कादायक प्रकार अकोला जिल्ह्यात समोर आलाय. विशेष म्हणजे मृतदेहाची परस्पर विल्हेवाट लावण्याचा त्याचा प्लॅन होता. मात्र गावकऱ्यांना संशय असल्याने स्मशानभूमीत त्याला अंत्यविधी करू दिला नाही. त्यामुळे मृतदेह गाडीत टाकून घेऊन जात असताना बुलडाणा जिल्ह्यातील देऊळगाव साकर्षाला लागून  असलेल्या चान्नी पोलिसांनी डॉक्टरचे हे कांड उघडकीस आणले.

डॉ. राजेश भास्कर ठाकरे असे या आरोपी डॉक्टरचे नाव असून पातूर येथील समर्थ नगरात वैद्यकीय व्यवसायाच्या निमित्ताने राहतो. डॉक्टरची पत्नी वर्षा ठाकरे (३५) हीचा त्याने गळा आवळून खून केला. त्यानंतर अंत्यविधीसाठी बायकोचा मृतदेह घेऊन तो त्याच्या मूळगावी चोंढी येथे घेऊन गेला. मात्र गावकऱ्यांना संशय आल्याने गावकऱ्यांनी अंत्यसंस्कार करण्यास नकार दिला. त्यामुळे डॉक्टरने बायकोचा मृतदेह गाडीत टाकून पुन्हा तो पातूरकडे निघाला.

 दरम्यान चान्नी पोलिसांनी डॉक्टरची गाडी अडवून चौकशी केली असता बायको आजारी आहे, तिने आत्महत्या केली असे उडवा- उडविची व विसंगत उत्तरे दिली. त्यामुळे पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेत उत्तरीय तपासणीसाठी पाठवला. तिथे गळा आवळून खून केल्याचे निष्पन्न झाल्याने पोलिसांनी खुनी डॉक्टरला अटक केली. खुनाचे नेमके कारण डॉक्टरने सांगितले नसले तरी चारित्र्याच्या संशयावरून हा खून झाल्याचे सांगण्यात येत आहे.