पोटात दुखतंय म्हणून महिला तपासायला गेल्यावर काय झालं वाचा...
जळगाव जिल्ह्यातील अंमळनेर तालुक्यातील गडखांब येथील कमलबाई रमेश भिल (४०) या महिलेच्या पोटात दुखत होतं. त्यामुळे त्यांना प्रचंड वेदना होत होत्या. नातेवाईकांनी त्यांना जळगावच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचारासाठी दाखल केलं. स्त्री रोग आणि प्रसुतिशास्त्र विभागात डॉक्टरांनी तपासणी केली असता तिच्या पोटात अनावश्यक मासाचा गोळा वाढत असल्याचं दिसून आलं.
सर्व तपासण्या केल्यानंतर हा अंडाशयाचा गोळा असल्याचे समोर आले. त्यामुळे महिलेच्या प्रकृतीला धोका निर्माण झाला होता. वैद्यकीय पथकाने तातडीने ऑपरेशन करण्याचा निर्णय घेतला. १ फेब्रुवारी रोजी डॉ. संजय बनसोडे व त्यांच्या सहकाऱ्यांनी शस्त्रक्रिया केली. महिलेच्या पोटातून १५ किलोचा गोळा निघाला. तिच्या जीवाला धोका निर्माण होऊ नये म्हणून गर्भाशय देखील काढण्यात आले. त्यामुळे महिलेचा जीव वाचला आहे. ऑपरेशन करणाऱ्या डॉक्टरांच्या टीमचे जिल्हाधिकाऱ्यांनी देखील कौतुक केले आहे.