रक्षा खडसेंनी राज्‍य सरकारला खडसावलं!

 
जळगाव ः राज्‍यात अतिशय चुकीच्या पद्धतीचे राजकारण सुरू आहे. दादागिरी करून, एखाद्याला खाली पाडून खच्चीकरण केले जात असेल तर ते चुकीचे आहे. मुख्यमंत्री शिवसेनेचे आहेत. त्यांच्याच पक्षातील कार्यकर्ते हल्ले करत असतील तर ही दादागिरीच आहे. कोणताही पक्ष ही दादागिरी खपवून घेणार नाही, असे भाजप नेत्या खासदार रक्षा खडसे यांनीही मुख्यमंत्री आणि महाविकास आघाडी सरकारला खडसावले आहे.
भाजप नेते किरीट सोमय्यांवर शनिवारी पुणे महापालिकेत शिवसैनिकांनी हल्ला केला होता. या हल्ल्याचा भाजप नेत्यांनी तीव्र शब्दांत निषेध व्यक्त केला. मुख्यमंत्री कार्यालयातून दिलेल्या सूचनेनंतर माझ्यावर हल्ला झाल्याचा आरोप सोमय्यांनी केला आहे. खासदार रक्षा खडसे यांनीही हल्ल्याचा निषेध केला. त्‍या म्‍हणाल्या, की तुम्ही भ्रष्टाचार केला नसेल, खरे आहात तर पुढे येऊन सांगायचा प्रयत्न करा, असे त्या म्हणाल्या. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी कुठल्याही हिंसेचे समर्थन करता येणार नाही, अशा शब्दांत सत्तेतील मित्रपक्ष शिवसेनेवर टीका केली आहे.