भाजपच्या नेत्यांवर कारवाई करत नसल्याने नगराळे हटवले, नवे पोलीस आयुक्त संजय पांडे!
एकीकडे केंद्रीय तपास यंत्रणा महाविकास आघाडीच्या एकेका मंत्री आणि नेत्याला गळाला लावत असताना मुंबईचे पोलीस मात्र फारशी तत्परता दाखवत नव्हते. हेमंत नगराळे राजकीय दबावाला झुकत नसल्यानेच त्यांना आता राज्य सुरक्षा महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक करण्यात आले आहे. निवृत्तासाठी अवघे काही महिने शिल्लक राहिलेल्या संजय पांडे यांना त्यांच्या जागी नियुक्ती देण्यात आली आहे. मुंबई मनपा निवडणुकीत संजय पांडे यांची भूमिका महत्त्वपूर्ण ठरू शकते, अशी चर्चा आहे.
परमबीर सिंह आणि सचिन वाझे यांच्यामुळे ठाकरे सरकारची प्रतिमा खराब झाली. त्यानंतर १९८७च्या आयपीएस बॅचचे अधिकारी हेमंत नगराळे यांच्याकडे मुंबईच्या आयुक्तपदाचा कारभार राज्य सरकारने दिला होता. मात्र नगराळे हे ठाकरे सरकारला अपेक्षित अशी तत्परता भाजप नेत्यांविरुद्ध कारवाई करताना दाखवत नव्हते. शिवसेना खासदार संजय राऊत यांनी पत्रपरिषद घेऊन भाजपच्या नेत्यांवर आर्थिक गैरव्यवहाराचे आरोप केल्यानंतर नगराळे यांनी तातडीने भाजपच्या संबंधित नेत्यांवर कारवाई करणे अपेक्षित होते. मात्र त्यांनी या राजकीय वादापासून अलिप्त राहणे पसंत केले. त्यामुळे ठाकरे सरकारने त्यांना हटवल्याची चर्चा आहे. संजय पांडे हे १९८६ च्या बॅचचे आयपीएस अधिकारी आहेत.