नव्या मंत्रीमंडळाच्या शपथविधीचा मुहूर्त ठरला?; देवेंद्र फडणवीस म्हणतात....

 
नागपूर(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): राज्यात शिंदे -फडणवीस सरकार आल्यानंतर आता नव्या मंत्रीमंडळाचा शपथविधी कधी होणार याकडे अख्ख्या राज्याचे लक्ष लागून आहे. नव्या मंत्रिमंडळात आपला नंबर लागावा यासाठी अनेक आमदार आपापल्या परीने फिल्डींग लावत आहेत. विविध सोशल माध्यमांवर संभाव्य मंत्रीमंडळाच्या याद्या फिरत असल्या तरी देवेंद्र फडणवीस यांचे धक्कातंत्र आता साऱ्यांनीच अनुभवल्याने कोणत्या यादा केव्हा बदलतील याचा नेम नाही.

 दरम्यान देवेंद्र फडणवीस यांना पत्रकारांनी नव्या मंत्रिमंडळाचा शपथविधी कधी असा प्रश्न विचारला असता त्यांनी पत्रकारांना उत्तर दिले. ते म्हणाले की गेल्या अनेक दिवसांपासून सुरू असलेल्या या राजकीय घडामोडीत आम्हाला अजून मंत्रिमंडळ विषयासंदर्भात बैठकीला वेळ मिळाली नाही. सरकार स्थापने नंतर बहुमत परिक्षणासाठी वेळ गेला.

गेल्या अनेक दिवसांपासून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठाण्यात आणि मी नागपुरात आलो नव्हतो. ज्या लोकांनी आपल्याला निवडून दिले त्यांच्या आशिर्वादा शिवाय कारभार कसा करायचा. त्यामुळे जनतेच्या आशिर्वादासाठी नागपुरात आलो आहे. उद्या किंवा परवा यासंदर्भातली बैठक होऊन लवकरच मंत्रिमंडळाचा विस्तार करू असे देवेंद्र फडणवीस म्हणाले.