चमत्कार..! डॉक्टरांनी मृत घोषित केलं, पाहुणे राव्हळे जमले, अंत्ययात्रा निघाली अन् तिरडीवरच उठून बसला २१ वर्षीय तरुण! पुढे जे घडल ते धक्कादायक

 
अकोला( लाइव्ह ग्रुप नेटवर्क): डॉक्टरांनी मृत घोषित केलेला तरुण चक्क तिरडीवर उठून बसल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आलाय. बुलडाणा जिल्ह्याला लागून असलेल्या अकोला जिल्ह्यातील चान्नी पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या विवरा गावात हा प्रकार भाऊबीजेच्या दिवशी घडला. प्रशांत मेशरे असे या तरुणाचे नाव असून तो होमगार्ड आहे.

त्याचे झाले असे की गेल्या काही दिवसांपासून तो आजारी होता. त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र नस चोक अप झाल्याने  त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले. घरातल्या तरुण मुलाचा मृत्यू झाल्याने कुटुंबावर शोककळा पसरली. ऐन भाऊबीजेच्या दिवशी हा आघात झाल्याने विवरा गावात हळहळ व्यक्त करण्यात येत होती. मात्र नियतीने दिलेले दुःख पचवणे सर्वांना भाग होते. घटनेची माहिती मिळताच प्रशांत चे नातेवाईक विवरा गावात आले. गावकऱ्यांनी अत्यंसंस्कराची तयारी सुरू केली. लाकडे जमा करून स्मशानभूमीत टाकण्यात आली. जाणकार लोकांनी तिरडी बांधली. मृत प्रशांतला अंघोळ घालण्यात आली. नवे कपडे घालून मृतदेह तिरडीवर ठेवण्यात आला. तरुण मुलाचा मृत्यू झाल्याने कुटुंबांचा शोक अनावर झाला होता, घरातील महिलांचा आक्रोश पाहून उपस्थितांचा कंठ दाटून आला होता. 

 तिरडी उचलून संध्याकाळी ७ वाजेच्या  सुमारास अंत्ययात्रा स्मशानभूमीकडे निघाली. गावापासून काही अंतरावर गेल्यावर अचानक तिरडी हलायला लागली. त्यामुळे ज्यांनी खांदा दिला होता ते बुचकळ्यात पडले. अनेकांचे पाय लटपट करायला लागले. मात्र जुन्या जाणत्यांनी आता तिरडी जवळच्या मंदिरात न्यायचे ठरवले. तिरडी मंदिरात ठेवल्यावर प्रशांत चक्क उठून बसला. ही वार्ता पसरताच गावात त्याला पाहायला प्रचंड गर्दी जमली. गर्दीवर नियंत्रण मिळविण्यासाठी पोलिसांना पाचारण करण्यात आले. रात्री अकराच्या सुमारास पोलिसांनी प्रशांत आणि त्याच्या भावाला ताब्यात घेतले. दरम्यान प्रशांत जादूटोणा करीत होता असे गावकऱ्यांचे म्हणणे आहे. मात्र असे असले डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलेच कसे असे अनेक प्रश्न आता उपस्थित झाले आहेत.