Love Story ची हेटस्टोरी... आधी पळवून लग्न केले अन् आता सोशल मीडियावर करतोय तिची बदनामी!
विवाहिता राहत असलेल्या भागातच तिचा पती राहतो. २००६ मध्ये त्याने तिला प्रपोज केले होते. त्याचा प्रस्ताव तिने स्वीकारला होता. मात्र दोघांच्या प्रेमाला तिच्या घरातील लोकांचा विरोध होता. त्यामुळे २०११ मध्ये दोघांनी पळून जाऊन लग्न केले. लग्नानंतर एक महिना सर्व काही सुरळीत चालले होते. एक महिन्याने तिला तिच्या मित्राचा खुशहाली विचारण्यासाठी फोन आला होता. त्याच्यासोबत बोलल्याचा राग रवींद्रला आला. त्याने तिला मारहाण केली. त्याला दारूचे व्यसन होते.
तो रोज घरी दारू पिऊन येऊ लागला. माझा खर्च मी करेल आणि तुझा खर्च तू कर, असे तो पत्नीला म्हणाला. लग्नानंतर तिचे शिक्षण सुरू असल्याने तिच्या शिक्षणाचा खर्च तो करत नव्हता. त्यामुळे ती जॉब करून नंतर कॉलेजला जात होती, असे तिने तक्रारीत म्हटले आहे. मोठे कुटुंब असल्याने किरकोळ कारणावरून कोणातही भांडण झाले तर त्याचा आरोप तिच्यावरच लावला जात होता. तिच्या पतीचा स्वभाव विचित्र होता. तिच्या चारित्र्यावर संशय घेत होता. २०१५ मध्ये तिला मुलगी झाली.
तिच्या फोनमधून तो तिच्या नकळत तिच्या मित्रांचे फोन नंबर घेऊन त्यांना फोन करत होता. छळाला कंटाळून ती माहेरी राहू लागली. त्यामुळे तो तिला सतत घाणेरडे मेसेज पाठवू लागला. अॅसिड फेकून जीवे मारण्याची धमकी देत होता. सोशल मीडियावर तो आता तिच्या नावाने बदनामीकारक मेसेज टाकतो, असे तिने तक्रारीत म्हटले आहे. तक्रारीवरून पोलिसांनी तिचा पती (३६), सासरे, सासू, दीर, जाऊ, नणंद यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.