चला दगडांच्या गावाला जाऊ या... या गावात सारं काही दगडाचंच... घरेही दगडाची अन् शौचालय, गोठेही दगडांचेच!!
आदिवासीबहुल गोंडपिंपरी या मागासलेल्या तालुक्यात किरमिरी हे गाव आहे. एकीकडे वर्धा नदी तर दुसरीकडे डोंगर. गावात ३५० ते ४०० घरे आहेत. गावातील लोकसंख्या १ हजार ३०० असून, या गावाचे वैशिष्ट्य म्हणजे ९५ टक्के घरे दगडांनी बांधलेले आहेत. गावाला लागून असलेल्या डोंगरात घिसी गोटा हा दगड मोठ्या प्रमाणात सापडतो. जेव्हा सिमेंटच्या घराची फॅशन नव्हती तेव्हा या गावातील दगडांना मोठी मागणी होती.
गावातील लोक डोंगरातील दगड काढण्याचे काम करायचे. दगड काढायचा आणि विकायचा हाच गावाचा मुख्य व्यवसाय होता. घराचे बांधकाम करण्यासाठी जिल्ह्यातील बऱ्याच गावातून ग्राहक या गावात यायचे. घराचं बांधकाम असो किंवा विहिरीचे. दगड मात्र किरमिरी गावाचा असायचा. त्याचप्रमाणे गावातील दगडी पाण्याचे टाके प्रसिद्ध होते. या टाक्याला मोठी मागणी होती.
लहान आकाराच्या टाक्यापासून तर मोठे टाके या गावातील गावकरी बनवत होते. आजही अनेक घरात किरमिरी येथील दगडी टाके दिसतात. पाण्याची टाकी बनवण्यासाठी भला मोठा दगड पोखरून काढावा लागत होता आणि तयार झालेले टाके बैलगाडीने ग्राहकापर्यंत पोहोचविले जात होते. गावाला लागूनच डोंगर असल्याने गावातील नागरिकांनी या डोंगरातून मिळणाऱ्या दगडाचाच वापर घराच्या बांधकामात केला. कौलारूचे घर असेल किंवा झोपडी वा जनावरांचा गोठा. भिंती दगडांच्या हे मात्र ठरलेलेच. आज दगडांची घरे फार कमी बांधले जातात. त्यामुळे दगडाला मागणी नाही. त्यामुळे आता गावकरी शेतीकडे वळले तर काहींनी वेगळा व्यवसाय सुरू केला आहे. काही लोक मजुरी करून उदरनिर्वाह करतात. दगडावर पडणारे लोखंडी घन आता धूळ खात पडले आहेत. मात्र अजून गावाची ओळख दगडांचे गाव अशीच आहे.