फेसबुकवरून ओळख अन्‌ प्रेम... हॉटेलवर नेत जबरदस्ती शरीरसंबंध!; तोतया पोलिसाची करामत, २५ वर्षीय तरुणीची आपबिती

 
नागपूर ः पोलीस असल्याची थाप मारून त्याने तिच्याशी फेसबुकवरून जवळीक साधली. यातून आधी मित्रता, नंतर दोघांत प्रेम झाले. तिचे प्रेम असले तरी त्‍याचा उद्देश काही वेगळाच होता. तो जणू संधीच शोधत होता. तिला भेटायला गेल्यानंतर त्याने तिला हॉटेलमध्ये नेले आणि संधी साधत तिच्याशी जबरदस्ती शारीरिक संबंध ठेवले. संबंधाचे फोटोशूट केले. त्यानंतर ते फोटो तिला दाखवून वारंवार शरीरसंबंधासाठी बाध्य करू लागला. मात्र तिने नकार दिला. त्‍यामुळे संतापून त्‍याने ते फोटो तिच्या नातेवाइकांना पाठवले. तिला संशय आल्यानंतर पोलीस खात्यात चौकशी केली असता तो पोलीस नसल्याचे समोर आले. फसवणूक झाल्याचे लक्षात येताच तिने नागपुरातील कळमना पोलीस ठाणे गाठून तक्रार दिली. तक्रारीवरून पोलिसांनी तोतया पोलिसाविरुद्ध गुन्हा दाखल केला. सोपान बालाजी बासिंगे (२७, रा. मुरकेवाडी, ता . लोहा , जि .नांदेड) असे आरोपीचे नाव आहे.

पोलीस सूत्रांच्या माहितीनुसार, पीडित तरुणी (२५) नागपुरातील रहिवासी आहे. फेसबुकवर तिची सोपानशी ओळख झाली. त्याची पोलीस दलात निवड झाली असून फक्त जाॅईन होणे बाकी आहे, असे तो तिला सांगत होता. फेसबुकवर दोघांचे प्रेम जुळले. फोन नंबरची देवाणघेवाण झाली. त्याने तिला लग्नाचे आमिष दाखविले. लग्न करेन तर तुझ्याशीच, असे तो तिला म्हणाला.

जानेवारीत तो तिला भेटायला नागपुरात आला. त्याने तिला सीताबर्डी परिसरातील एका हॉटेलमध्ये नेले. तिथे तिच्याशी जबरदस्ती शारीरिक संबंध ठेवले. या वेळी त्याने तिचे न्यूड फोटो त्याच्या मोबाइलमध्ये काढले. त्यानंतर तो ते न्यूड फोटो तिला दाखवून वारंवार शारीरिक संबंधांची मागणी करू लागला. तिने विरोध केला असता त्याने ते न्यूड फोटो नातेवाइकांना पाठविण्याची धमकी दिली. संशय आल्याने तिने चौकशी केली असता तो पोलीस नसल्याचे समोर आले.

फसवणूक झाल्याचे लक्षात आल्याने ती त्याला टाळू लागली. ती टाळत असल्याने सोपानने तिचे न्यूड फोटो तिच्या नातेवाइकांना पाठवले. नातेवाइकांनी तरुणीला विचारणा केल्यावर ती हादरली. कुटुंबियांनी धीर दिल्याने अखेर ४ एप्रिलला तिने नागपुरातील कळमना पोलीस ठाण्यात तक्रार दिली. तक्रारीवरून पोलिसांनी बलात्कार, ॲट्रॉसिटी, विनयभंग तसेच आयटी ॲक्टनुसार गुन्हा दाखल केला आहे.