हायटेक पत्नी...! पतीचे अनैतिक संबंध शोधण्यासाठी GPS ट्रॅकरचा वापर, पती रंगेहाथ जाळ्यात!!

 
पुणे : हल्ली अनैतिक संबंधामुळे नात्यामध्ये अविश्वास निर्माण होत घटस्फोटापर्यंत प्रकरणे ताणली जात असल्याची उदाहरणे समोर येत आहेत. पत्नी असतानाही मीटिंगच्या नावाखाली प्रेयसीला भेटायला जाणे एका उद्योजकाला चांगलेच महागात पडले. उद्योजकाच्या पत्नीने जीपीएस ट्रॅकरच्या मदतीने पतीच्या विवाहबाह्य संबंधाचा पर्दाफाश केला. सर्व पुरावे गोळा करून थेट पोलीस ठाण्यात पतीविरुद्ध तक्रार दिली. पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपासाला सुरुवात केली आहे. आरिफ मांजरा असे गुन्हा दाखल झालेल्या उद्योजकाचे नाव असून, तो गुजरात राज्यातील रहिवासी आहे.

पोलीस सूत्रांच्या माहितीनुसार, आरिफ मांजरा हा व्यवसायिक मीटिंगच्या नावाखाली प्रेयसीला भेटायला जात होता. आरिफचे आपल्यावरील प्रेम कमी होत आहे असे सतत त्याच्या पत्नीला वाटायचे. आरिफच्या वागण्यातील बदल जाणवू लागल्याने पतीचे दुसरीकडे कुठेतरी लफडे सुरू तर नाही ना, असा संशय तिला आला. यासाठी तिने तंत्रज्ञानाची मदत घेतली.

पतीच्या कारमध्ये जीपीएस ट्रॅकर बसवले. आरिफ पत्नीला खोटे बोलून नेहमी पुण्याला जात असल्याचे ट्रॅकरवरून पत्नीच्या लक्षात आलं. त्यानंतर त्याच्या पत्नीने त्याची गाडी मुक्कामी असलेल्या हॉटेलचा पत्ता शोधला. हॉटेलच्या  मॅनेजरला फोन करून आरिफसोबत कोण आहे, अशी विचारणा केली तेव्हा त्याच्यासोबत त्याची पत्नी असल्याची माहिती मॅनेजरने दिली. हे ऐकून आरिफच्या खऱ्या पत्‍नीला धक्का बसला. त्यानंतर पत्नीने अधिक चौकशी केली असता आरिफसोबत त्याची प्रेयसी असल्याची माहिती तिला मिळाली. माहिती मिळताच तिने पुणे गाठले आणि हॉटेलमध्ये जाऊन नवऱ्याचे आणि त्याच्या प्रेयसीचे सीसीटीव्ही फुटेज मिळवले. आरिफच्या पत्नीने सर्व पुरावे गोळा केल्यानंतर थेट पोलीस ठाण्यात जाऊन पतीविरुद्ध तक्रार दाखल केली आहे. तक्रारीवरून पोलिसांनी आरिफविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.