हॉटेलमध्ये जेवायला नेतो म्हणाला अन् लॉजवर नेले!; १६ वर्षीय मुलीवर तरुणाचा लैंगिक अत्याचार
Mar 28, 2022, 12:26 IST
चिंचवड : अल्पवयीन मुलीला २२ वर्षीय तरुणाने हॉटेलमध्ये जेवायला नेतो असे सांगून लॉजवर नेले. तिथे तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. मुलीने २७ मार्च रोजी याप्रकरणी पिंपरी चिंचवडच्या चिखली पोलीस ठाण्यात तक्रार दिली. तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल करत आरोपी तरुणाला अटक केली आहे. २४ मार्चला दुपारी अडीचच्या सुमारास चिंचवडच्या कृष्णानगर भागात ही घटना घडली घडल्याचे मुलीने तक्रारीत म्हटले आहे.
युवराज साळुंखे (२२, रा. महात्मा फुलेनगर, चिंचवड) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित १६ वर्षीय मुलीची आणि युवराजची ओळख होती. २४ मार्चला दुपारी युवराजने मुलीला जबरदस्ती एका टेम्पोत बसवले. हॉटेलमध्ये जेवायला घेऊन जातो असे म्हणत त्याने तिला अजिंठानगर भागातील एका लॉजवर नेले.
तिथे तिच्यावर जबरदस्ती लैंगिक अत्याचार केला. घडला प्रकार तुझ्या आईवडिलांना सांगितला तर बघून घेईल, अशी धमकी त्याने दिली. त्यामुळे घाबरलेल्या मुलीने आधी घडला प्रकार कुणाला सांगितला नाही. मात्र तिच्या वर्तनात बदल झाल्याने आई- वडिलांनी विश्वासात घेऊन तिची विचारपूस केली, तेव्हा हा प्रकार समोर आला. त्यानंतर पीडित मुलीने २७ मार्चला चिखली पोलीस ठाण्यात तक्रार दिली.