प्राध्यापक तरुणीवर पोलिसाचा वारंवार लैंगिक अत्याचार; एकटेपणाचा गैरफायदा घेतला
Mar 1, 2022, 10:24 IST
पुणे ः हिंजवडी पोलीस ठाण्यात कार्यरत असलेल्या ३० वर्षीय पोलिसाने लग्नाचे आमिष दाखवून २८ वर्षीय प्राध्यापक तरुणीवर वारंवार लैंगिक अत्याचार केल्याची घटना पुण्यात समोर आली आहे. भोसरी पोलिसांनी संशयित पोलिसाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
आकाश प्रकाश पांढरे असे गुन्हा दाखल झालेल्या पोलिसाचे नाव आहे. पीडित तरुणी चिमुकल्या मुलीसह भोसरी परिसरात राहते. तिच्या एकटेपणाचा फायदा घेत आकाशने पोलीस असल्याचे सांगून तिला धमकावले. तू एकटी कशी राहतेस बघतो, असे म्हणून तिला लग्नाचे आमिष दाखवले. वेगवेगळ्या ठिकाणी नेत तिच्याशी वारंवार शारीरिक संबंध व अनैसर्गिक संबंध ठेवल्याचा आरोप पीडितेने केला आहे. ऑक्टोबर २०२० ते २ जानेवारी २०२२ या काळात त्याने लैंगिक शोषण केल्याचे पीडितेने म्हटले आहे. या संबंधातून पीडिता गर्भवती राहिली. तेव्हा त्याने तिचा गर्भपात करवला. भोसरी पोलिसांनी आकाश पांढरेविरुद्ध गुन्हा दाखल केला असून, तपास पोलीस उपनिरिक्षक पूजा कदम करत आहेत.