आधी आईने प्रियकरासोबत रंगेहात पकडले... नंतर ती बॅग भरून निघाली, आईने विचारले कुठे जातेय... ती म्हणाली, मी कुठेही जाईन, तुला काय करायचं!!

 
चंद्रपूर : अल्पवयीन असताना मुली प्रेमाच्या जाळ्यात अडकतात. आई- वडिलांचा, मागचा पुढचा कुठलाही विचार न करता प्रियकरासोबत निघून जातात. प्रेमात त्या एवढ्या आंधळ्या होतात की त्यांना कशाचेही भान राहत नाही. राज्यात सध्या अल्पवयीन मुलींच्या अपहरणाच्या घटना समोर येत असल्या तरी बहुतांश प्रकरणात त्या स्वखुशीने प्रियकरासोबत पळून जात असल्याचे समोर आले आहे. मात्र कायदेशीर दृष्ट्या अल्पवयीन असल्याने अशा प्रकरणात अपहरणाचा गुन्हा दाखल होतो. चंद्रपूर जिल्ह्यातील वरोरा येथून १७ वर्षीय मुलगी तिच्या प्रियकरासोबत निघून गेली. पोलिसांनी प्रियकराविरुद्ध अपहरणाचा गुन्हा दाखल केला.

वरोरा येथील अल्पवयीन मुलीच्या आईने तक्रार दिली, की १७ फेब्रुवारी रोजी रात्री ९ वाजता जेव्हा त्या घरी आल्या तेव्हा त्यांना त्यांच्या मुलीसोबत शुभम झाडे नावाचा तरुण दिसला. विचारणा केली असता माझे तुमच्या मुलीवर प्रेम आहे, असे शुभमने सांगितले. तेव्हा तुम्हाला लग्न करायचे असेल तर करा. पण पुन्हा आमच्या घरी येऊ नको, असे मुलीच्या आईने सांगितले. त्यानंतर शुभम त्याच्या घरी निघून गेला.

दुसऱ्या दिवशी सकाळी मुलगी बॅगमध्ये सामान घेऊन बाहेर जात होती. कुठे जात आहे अशी विचारणा केल्यावर, मी कुठेही जाईन तुला काय करायचं... असे म्हणत ती निघून गेली. दिवसभर तिचा शोध घेऊनही ती सापडली नाही. अखेर मुलीच्या आईने वरोरा पोलीस ठाण्यात तक्रार दिली. शुभम झाडे यानेच मुलीला फूस लावून पळवून नेले, अशा तक्रारीवरून अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला.