फेसबुक लव्हस्टोरी! ओळख झाली, प्रेम झाले, भेटीगाठी वाढल्या अन्‌ घरच्यांनीही लग्नही लावले... पण नंतर सुरू झाली "रिअल स्‍टोरी'!

 
नागपूर ः लव्हस्टोरी नागपूरची आहे. तिची अन्‌ त्‍याची ओळख फेसबुकवरून झाली. ओळखीतून मैत्री झाली. मैत्रीतून प्रेम झाले... भेटीगाठी वाढल्या... ती पुण्यात शिकत असताना तो नागपूरहून तिला भेटायला पुण्याला जायचा... शिक्षणानंतर ती नागपूरला आली आणि दोघांत लग्नाची चर्चा सुरू झाली... ती प्रेमात आकंठ बुडाली होती... दोघांचे प्रेम पाहून तिच्या घरच्यांनी लग्नाला होकार भरला... लग्न होऊन ती सासरी आली... नवलाईने दोन महिने सरले... अन्‌ मग तिच्या आयुष्यात सुरू झाली हेट स्‍टोरी... सासू, सासरे, नणंद अन्‌ कधीकाळी आकंठ प्रेम करणारा प्रियकर ते पती झालेला तो... तिच्यासमोर खरे चेहरे घेऊन प्रकटले... ती हादरून गेली... दारू पिऊन तो रोज मारहाण करू लागला... ६ लाख रुपयांसाठी तिला त्‍याने घराबाहेर काढले... अखेर तिने पोलिसांत धाव घेऊन तक्रार दिली.

सौ. अश्विनी कुनाल सावणकर (३१, .एन.आय.टी. कॉम्प्लेक्स आयुर्वेदिक ले आउट, नागपूर) या विवाहितेने सक्करदरा पोलीस ठाण्यात या प्रकरणी तक्रार दिली आहे. ती कुणाल पुरुषोत्तम सावणकर (३२) याच्यासह सासू, सासरे (रा. कुकडे ले आउट, खापरी,नागपूर) व नणंद (रा. सिडको म्हाडा कॉलनी औरंगाबाद) यांचा गुन्हा दाखल झालेल्यांत समावेश आहे. अश्विनीचे शिक्षण बी.टेक.काॅस्मेटिक झाले आहे. तिची २०१५ मध्ये कुणालसोबत फेसबुकवर ओळख झाली. त्यानंतर मैत्री झाली. दोघांच्या भेटीगाठी वाढल्या. ती पुण्याला पुढील शिक्षण घेण्यासाठी गेली तेव्हाही कुणाल तिला भेटण्यासाठी पुण्याला जायचा.

ती नागपूरला परतली, तेव्हा कुणाल इलेक्ट्रीकलचे काम करायचा. दोघांनी २०१८ मध्ये लग्न करण्याचा निर्णय घेतला. तशी घरी माहिती दिली. दोघांच्याही घरच्यांनी आढेवेढे न घेता लग्नाला होकार दिला. ११ नोव्हेंबर २०१८ रोजी दोघांचे लग्न लागले. ती सासरी नांदायला गेली. सुरुवातीचे दोन महिने तिला सर्वांनी चांगली वागणूकही दिली. नंतर मात्र नणंदेने तिच्यासोबत किरकोळ कारणावरून भांडणे सुरू केली. तुला स्वयंपाक येत नाही, घरकाम येत नाही, तुझ्या आई-वडिलांनी चांगले संस्कार दिले नाही असे म्हणून तिला शिविगाळ करू लागली. एकदा मारहाणही केली. पती, सासू, सासऱ्याला तिच्याबद्दल भडकावू लागली. कुणालही दारू पिऊन छोट्या छोट्या कारणावरून मारहाण करू लागला. सासरे कधीही बेडरूममध्ये शिरायचे. मुलाला फसवले म्‍हणून अश्लील बोलायचे. मूलबाळ होऊ नये म्‍हणून तिला नवऱ्यासोबत झोपू देत नसत. कुणालही पुरता बदलला होता. माहेरावरून ६ लाख रुपये आण असे म्‍हणून तो तिला छळू लागला. अखेर ३ नोव्हेंबर २०२१ रोजी तिला घराबाहेर हाकलले.