चर्चा : औरंगाबादमध्ये लोक तलवारी कशासाठी मागवताहेत?
ज्या पार्सलमधून तलवारी पाठविण्यात आल्या त्यावर नावे कोडवर्डमध्ये लिहिलेली आहेत. जागेचे नाव, व्यक्तीचे पहिले नाव आणि नंबर आहे. त्यामुळे त्या नंबरच्या माध्यमातून तलवारी कुणी मागविल्या याचा तपास पोलीस करणार आहेत. तलवारीचे पार्सल पंजाबमधून आल्याने पंजाब पोलिसांशी संपर्क करून माहिती मिळविण्याचा प्रयत्न करणार असल्याचे क्रांती चौक पोलीस ठाण्याचे ठाणेदार गणपत दराडे यांनी सांगितले. या तलवारी सात वेगवेगळ्या पार्सलमधून पाठविण्यात आल्या होत्या.
औरंगाबाद येथील पाच आणि जालन्यातील दोन जणांचे पत्ते पार्सलवर देण्यात आलेले असल्याचे पोलिसांनी सांगितले. याआधी सुद्धा पोलिसांनी कुरिअरमधून आलेल्या ५० तलवारी जप्त केल्या होत्या. औरंगाबादच्या पुंडलिकनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत या तलवारी जप्त करण्यात आल्या होत्या. या प्रकरणाचा तपास करणारे पुंडलिकनगरचे ठाणेदार व्यंकटेश केंद्रे यांनी सांगितल्यानुसार, त्या तलवारी दानिश नावाच्या एका व्यक्तीने ऑर्डर केल्या होत्या. तो लोकांना तलवारी भाड्याने द्यायचा व विकायचासुद्धा.
या प्रकरणात पोलिसांनी एकूण ७ आरोपींना अटक केली होती. लोकांनी या तलवारी लग्नासाठी, वाढदिवसाचे केक कापण्यासाठी किंवा दिखाव्यासाठी विकत घेतल्याचे पोलीस चौकशीत समोर आले होते. पंजाबमध्ये शीख धर्मीय लोकांना तलवार किंवा कृपान वापरण्याची परवानगी आहे. त्यामुळे पंजाबमध्ये मोठ्या प्रमाणात तलवारी आणि कृपाण सहज उपलब्ध होतात. त्यामुळे पंजाबमधून तलवारी मागविण्याचा ट्रेंड वाढला आहे. देशभरात परवाना असेल तरच तलवार बाळगता येते. त्यामुळे विनापरवाना तलवार बाळगल्यास आर्म ॲक्ट कायद्याद्वारे गुन्हा दाखल करण्यात येतो. या गुन्ह्यात आरोपीला तुरुंगवास सुद्धा भोगावा लागतो.