बुलडाणा सायकलिंग क्लबच्या सदस्यांना दोंडाईचात आला सुखद अनुभव!, नक्की काय झालं वाचा...
दोंडाईचाचे सायकलिस्ट महेंद्रकुमार बाविस्कर यांनी यासाठी पुढाकार घेतला. पर्यावरण रक्षणाचा संदेश व किप इंडिया फीट इंडिया असा संदेश देत बुलडाण्याच्या जयस्तंभ चौकातून पहाटे चारला सायकलिस्ट निघाले आहेत. बुलडाणा ते स्टॅच्यू ऑफ युनिटी पुढे वडोदरा असा ४७५ किलोमीटरचा प्रवास ते करणार आहेत. उद्या, ६ एप्रिलला ते वडोदाराला पोहोचण्याची शक्यता आहे.
यात संजय मयुरे, संदीप मुंढे, सरदारसिंग ठाकूर, विष्णू भगवान गाढे, गणेश देवरे, दीपक पैठणे, ज्ञानबा मापारी आदींचा सहभाग आहे. प्रवासात त्यांनी १ हजारपेक्षा जास्त सीडबॉलव्दारे विविध झाडांच्या बियांचे रोपण केले आहे. शिरपूर- शहादा दरम्यान दोंडाईचा सायकलिस्टचे महेंद्रकुमार बाविस्कर व त्यांच्या सहकाऱ्यांनी या सायकलपटूंची भेट घेत स्वागत केले. काही वेळ सोबत घालवत सायकलिंगचे अनुभव त्यांनी एकमेकांना सांगितले. त्यानंतर हे टीम पुढील प्रवासाला रवाना झाली. बाविस्कर यांना दोंडाईचा ते लोणार सरोवर सायकल यात्रा करण्याचे आमंत्रणही टीमने दिले.