भोंदू बाबा म्हणे, शैतान मेरे से ज्यादा शक्तिशाली...तिला माझ्याजवळ एकट ठेवा, तिच्या अंगातील भूत काढतो...नंतर रात्रभर तरुणीवर केला अत्याचार!

 
यवतमाळ : अंगातील भूत काढण्याचे नाटक करत एका तरुणीवर आदिलाबादच्या मांत्रिकाने लैंगिक अत्याचार केला. समाजमन सुन्‍न करणारी ही घटना यवतमाळच्या नागपूर मार्गावरील एका वसाहतीत घडली. याप्रकरणी शेखर अण्णा नावाच्या आदिलाबाद (तेलगांना) येथील एका भोंदू बाबाविरुद्ध यवतमाळ शहर ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलीस सूत्रांच्या माहितीनुसार, २२ वर्षीय तरुणी नेहमी चिडचिड करत होती. तिची मानसिकता ठीक राहत नसल्याने एका ओळखीच्या व्यक्तीने आदिलाबाद येथील शेखर आण्णा हा तांत्रिक असून तो कोणतेही भूत काढून टाकतो, असे सांगितले. भूत काढण्यासाठी शेखर आण्णाला बोलवायचे ठरले. त्यानंतर २३ जानेवारीला शेखर अण्णा दोन साथीदारांना घेऊन आदिलाबादवरून यवतमाळला  आला. लिंबू कापून तरुणीवर उपचार करण्याचे त्याने नाटक केले. त्यानंतर चार ते पाच दिवस शेखर आण्णाने साथीदारांच्या मदतीने भूत काढण्यासाठी उपचार केले.

दरम्यान, २८ जानेवारीला शेखर अण्णा त्या तरुणीच्या नातेवाइकांना म्हणाला "शैतान मेरे से बहुत शक्तिशाली है, मुलीला एकटं माझ्याजवळ ठेवा. कुटुंबियांना मुलीच्या अंगातले भूत काढायचे असल्याने त्यांनी संमती दिली. कुटुंबीय शेखर आण्णाच्या बहकाव्यात आल्याने तरुणीला शेखर आण्णा याच्याजवळ ठेवले. यावेळी तरुणी एकटी असल्याचा फायदा घेत शेखर आण्णा याने अंगातील भूत काढण्याचे नाटक करून तरुणीवर रात्रभर लैंगिक अत्याचार केला. याबाबत कोणाला सांगितल्यास जीवे मारण्याची धमकीही दिली. त्यामुळे तरुणी घाबरली होती. दुसऱ्या दिवशी शेखर आण्णा त्याच्या दोन साथीदारांना सोबत घेऊन आदिलाबादला निघून गेला. त्यानंतर घडलेला प्रकार तरुणीने कुटुंबियांना सांगितला. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन कुटुंबीयांनी थेट यवतमाळ शहर पोलीस ठाण्यात तक्रार दिली. तक्रारीवरून पोलिसांनी शेखर अण्णा नावाच्या भोंदू बाबाविरुद्ध दाखल केला आहे.