BREKING भीषण अपघात!; उभ्या दूध टँकरला ट्रक धडकला! त्यानंतर एकापाठोपाठ आदळली चार वाहने! पाच जण जागीच ठार

 
मलकापूर(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): बंद पडलेल्या दुधाच्या टँकर मधून दुसऱ्या टँकर मध्ये दूध टाकत असतांना पाठीमागून आलेल्या दुसऱ्या भरधाव ट्रक ने धडक दिली. त्यावर पुन्हा एकापाठोपाठ चार ते पाच वाहने आदळली . या भीषण आणि विचित्र अपघातात ५ जण ठार झाले. ही घटना आज, १३ मे रोजी पहाटे  बुलडाणा जिल्ह्याला लागून असलेल्या मुक्ताईनगर तालुक्यात घडली.

मुक्ताईनगर तालुक्यातील घोडसगावजवळ राष्ट्रीय महामार्गावर धुळ्याहून मलकापूरकडे दूध घेऊन येणारा टँकर बंद पडला होता. त्यामुळे टँकर मालकाने घटनास्थळी दुसरा टँकर बोलावला . बंद पडलेल्या टँकरमधून दुसऱ्या टँकर मध्ये दूध टाकण्याचे काम सुरू होते. या कामासाठी एक क्रेन सुद्धा बोलावण्यात आली होती. दरम्यान अंधारात उभे टँकर आणि क्रेन न दिसल्याने टाईल्सने भरलेला ट्रक दुधाच्या टँकरला धडकला.

त्या पाठोपाठ दोन कार सुद्धा ट्रकवर आदळल्या. या अपघातात बंद पडलेल्या टँकर मधील तिघे, धुळ्यावरून बोलावलेल्या दुसऱ्या टँकरचा मालक व आणखी १ अशा पाच जणांचा जागीच मृत्यू झाला. ठार झालेल्यांचे मृतदेह मुक्ताईनगरच्या उपजिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आले आहेत. दरम्यान मुक्ताईनगर पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.