संगीत क्षेत्राला आणखी एक धक्का!; ज्येष्ठ गायक, संगीतकार बप्पी लहिरी यांचे निधन
बप्पीदांचा जन्म २७ नोव्हेंबर १९५३ रोजी पश्चिम बंगालमध्ये झाला होता. १९८२ मध्ये मिथुन चक्रवर्ती यांच्या डिस्को डान्सर या चित्रपटामुळे बप्पी लहिरी खऱ्या अर्थाने प्रकाशझोतात आले होते. त्यांनी अनेक चित्रपटांसाठी गायक, संगीतकार म्हणून काम केले आहे. त्यांच्या पश्चात पत्नी चित्रानी, मुलगी गायिका रेमा लहिरी बन्सल असा परिवार आहे.
बप्पीदांचे मूळ नाव आलोकेश लहरी होते. त्यांना सोन्याचे दागिने घालण्याची प्रचंड आवड होती. गळ्यात चेन, हातात अंगठ्यांमुळे त्यांची भारदस्तता काही औरच होती. त्यांनी कारकीर्दीत अनेक हिट गाणी दिली. चलते चलते, डिस्को डान्सर आणि शराबी या चित्रपटांमधील त्यांची गाणी त्यांना लोकप्रियतेच्या शिखरावर घेऊन गेली. २०१४ च्या निवडणुकीत त्यांनी भाजपकडून निवडणूक लढवली होती. मात्र ते पराभूत झाले होते. निवडणूक आयोगाला त्यांनी जे प्रतिज्ञापत्र दिले, त्यानुसार सन २०१४ मध्ये त्यांच्याकडे ७५४ ग्रॅम सोनं आणि ४.६२ किलो चांदी होती.