८ वर्षांचे प्रेम... प्रियकराने नोकरी लागताच शोधली दुसरी... नंतर तिच्याही लग्नात केले विघ्न!; गळफास घेऊन तिने संपवले आयुष्य!!
पोलीस सूत्रांच्या माहितीनुसार, जोगीनगरात राहणाऱ्या प्रियाचे (नाव बदलले आहे) ८ वर्षांपासून गल्लीत राहणाऱ्या संकेतशी प्रेमसंबंध होते. संकेतने तिला लग्नाचे आश्वासन दिले होते. मात्र प्रेमप्रकरण सुरू असताना संकेतला सरकारी नोकरी लागली. त्यानंतर त्याचे दुसऱ्याच मुलीशी प्रेमप्रकरण सुरू झाले. ही बाब प्रियाला माहीत झाल्यानंतर संकेत आणि तिच्यात वाद झाले. त्यानंतर संकेत प्रियाला मानसिक त्रास देऊ लागला. त्यानंतर संकेत आणि प्रियामध्ये आपसात समजोता झाला.
यानंतर आपण वेगळे आहोत. तू तुझे पहा, मी माझे पाहतो, असे म्हणत ब्रेकअप झाल्याचे ठरले. त्यानुसार दोघेही लग्न करण्यास स्वतंत्र झाले. त्यानंतर प्रियाच्या आई- वडिलांनी प्रियासाठी स्थळ शोधले. त्यानुसार २२ जानेवारी २०२२ रोजी टिळ्याचा कार्यक्रम झाला. १२ फेब्रुवारी २०२२ रोजी साखरपुडा करण्याचे ठरले होते. दरम्यान प्रियाचे लग्न ठरल्याचे संकेतला माहीत होताच तो हादरून गेला.
पुन्हा त्याला प्रेम आठवू लागले. त्याने तिच्याशी संपर्क केला व सांगितले, की तू जर दुसऱ्याशी लग्न केले तर मी आपले संबंध उघड करेन. तुझी समाजात बदनामी करेन. संकेतने जर बदनामी केली तर घरच्यांना खूप मोठा मानसिक त्रास सहन करावा लागेल या भीतीपोटी प्रियाने २८ जानेवारी रोजी दुपारी अडीचला राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. प्रियाच्या आईने दिलेल्या जबाबावरून पोलिसांनी संकेतविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल केला आहे.