५५ च्या प्रॉपर्टी डिलरचे २२ वर्षीय तरुणीसोबत अश्लील चाळे!; धुळे व्हाया छिंदवाडा अशी पोहचली होती नागपुरात...
पोलीस सूत्रांच्या माहितीनुसार, थोरात याचा एक मित्र मध्यप्रदेशातील छिंदवाडा येथे राहतो. त्याच्या मित्राची छिंदवाडा येथे कंपनी आहे. धुळे येथील तरुणी या कंपनीत नोकरीला आहे. थोरात ने त्याच्या मित्राला फोन करून छिंदवाडा येथे उच्च दर्जाचा गूळ मिळतो तो पाठव, असे सांगितले होते. त्यानुसार थोरातच्या मित्राने तरुणीजवळ गूळ पाठवला व थोरातचा मोबाइल नंबर देऊन तो त्याच्याकडे सोपविण्यास सांगितले होते. दरम्यान २२ नोव्हेंबरला तरुणी नागपुरातील मध्यवर्ती बसस्थानकावर आली होती.
तिने थोरातला फोन करून गूळ घेऊन जाण्यासाठी बोलावले होते. थोरात त्याच्या कारने तिथे पोहोचला. त्याने तरुणीला आपल्या कारमध्ये बसून सीताबर्डी भागातील एका मोठ्या हॉटेलमध्ये नेले. तिला खाऊ-पिऊ घातल्यानंतर फिरविण्यासाठी सेमिनरी हिल्सला नेले. तिथे कार थांबवून तरुणीसोबत अश्लील चाळे करत बलात्काराचा करण्याचा प्रयत्न केला.
तरुणीने विरोध करत आरडाओरड केल्याने तो घाबरला आणि त्याने तरुणीला सीताबर्डी बसस्थानकावर आणून सोडले. त्यानंतर तरुणी आपल्या गावी धुळे येथे निघून गेली. त्यानंतर तब्बल ४४ दिवसांनी तरुणीने कंपनी संचालकासह म्हणजेच थोरातच्या मित्रासह नागपूर गाठले आणि सीताबर्डी पोलीस ठाण्यात तक्रार दिली.
मी घाबरले होते. बदनामीचासुद्धा धाक होता. मात्र गावाकडच्या मित्रांनी आणि कंपनीच्या संचालकांनी धाडस दिल्याने तक्रार नोंदवत असल्याचे तिने सांगितले. पोलिसांनी थोरातविरुद्ध गुन्हा दाखल करून त्याला अटक केली आहे. थोरात ने मी गुन्हा केलाच नाही, असे पोलिसांना सांगितले आहे. मित्राकडे माझे पैसे आहेत. त्याला ते परत द्यायचे नसल्याने त्याने हा कट रचल्याचे थोरात पोलिसांना सांगत आहे.