गेल्या महिन्यात २६ हजार बेरोजगारांना मिळाला रोजगार!

मंत्री मलिक यांचा दावा, काय आहे सत्य...
 
मुंबई (मुंबई लाइव्ह वृत्तसेवा) ः कोरोनाच्या संकटामुळे बेरोजगारीची समस्या निर्माण झाली असताना कौशल्य विकास, रोजगार आणि उद्योजकता विभागामार्फत राबविण्यात येत असलेल्या विविध उपक्रमांद्वारे राज्यात विविध कंपन्या, कॉर्पोरेट संस्था, उद्योगांत गेल्या महिन्यात नोव्हेंबरमध्ये 26 हजार 93 बेरोजगार उमेदवारांना रोजगार मिळवून देण्यात आल्याचा दावा या विभागाचे मंत्री नवाब मलिक यांनी केला आहे. महास्वयंम वेबपोर्टल, ऑनलाईन रोजगार मेळावे आदी विविध उपक्रमांद्वारे राज्यात नोकरीइच्छुक उमेदवार आणि विविध कंपन्या, कॉर्पोरेट संस्था, उद्योग यांची सांगड घालून रोजगार उपलब्ध करून देण्यात येतो, असे ते म्‍हणाले. अशा विविध उपक्रमांमधून मागील वर्षी 2020 मध्ये राज्यात 1 लाख 99 हजार 486 उमेदवारांना रोजगार मिळवून देण्यात यश आले, तर चालू वर्षात जानेवारी ते नोव्हेंबरअखेर 1 लाख 73 हजार 974 बेरोजगारांना रोजगार मिळवून देण्यात आला आहे, असेही त्‍यांनी सांगितले.

मंत्री श्री. मलिक म्हणाले की, बेरोजगार उमेदवार आणि उद्योजक यांच्यामध्ये सांगड घालण्यासाठी कौशल्य विकास, रोजगार आणि उद्योजकता विभागाने https://rojgar.mahaswayam.gov.in हे वेबपोर्टल सुरू केले आहे. या वेबपोर्टलवर बेरोजगार उमेदवार आपले शिक्षण, कौशल्ये, अनुभव आदी माहीतीसह नोंदणी करतात. त्याचबरोबर कुशल उमेदवारांच्या शोधात असलेल्या कंपन्या, उद्योजक, कॉर्पोरेट्स हे सुद्धा या वेबपोर्टलवर नोंदणी करून त्यांना हवे असलेले कुशल उमेदवार शोधू शकतात.

नोकरीइच्छूक उमेदवारांनी या वेबपोर्टलवर नोंदणी करणे आवश्यक आहे. विभागामार्फत जिल्ह्यांमध्ये वेळोवेळी ऑनलाईन रोजगार मेळाव्यांचेही आयोजन करण्यात येते. विभागाकडे, महास्वयंम वेबपोर्टलवर आतापर्यंत 92 हजार 350 इतक्या सार्वजनिक व खाजगी उद्योजकांनी नोंदणी केली आहे. यापैकी अनेक उद्योजक आवश्यकतेनुसार त्यांच्याकडील रिक्त पदांची भरती महास्वयंम वेबपोर्टल तसेच कौशल्य विकास विभागाचे ऑनलाईन मेळावे आदी उपक्रमांमधून वेळोवेळी करतात. त्यामुळे नोकरीइच्छुक उमेदवारांना कौशल्य विकास विभागाच्या उपक्रमांमधून नोकरी मिळविण्यासाठी चांगले व्यासपीठ उपलब्ध झाले आहे, असे मंत्री श्री. मलिक यांनी सांगितले.