नोकरीचे आमिष दाखवून पोलीस कर्मचाऱ्याचा २० वर्षीय तरुणीवर बलात्कार!; तिने त्‍याच्‍याच घरात घेतला गळफास!!

 
यवतमाळ (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः यवतमाळ जिल्ह्यात एका पोलीस कर्मचाऱ्याने २० वर्षीय तरुणीला नोकरीचे आमिष दाखवून बलात्कार केल्याचा प्रकार समोर आला आहे. त्रास असह्य झाल्याने तरुणीने पोलीस कर्मचाऱ्याच्या घरातच गळफास घेऊन आत्महत्या केली. तरुणीच्या वडिलांनी दिलेल्या तक्रारीवरून पोलीस कर्मचाऱ्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याला अटकदेखील करण्यात आली आहे. विजय हटकर (४२) असे या पोलीस कर्मचाऱ्याचे नाव असून, दंगल नियंत्रण पथकात तो कार्यरत होता.

सूत्रांच्या माहितीनुसार, तरुणी पुसद तालुक्यातील वेणी येथील रहिवासी आहे. तिने पोलीस बनण्याचे स्वप्न पाहिले होते. त्यादृष्टीने तिची तयारीदेखील सुरू होती.विजय हटकर याला बंदोबस्तासाठी उमरखेड येथे नियुक्ती दिलेली होती. तिथे तो भाड्याच्या घरात राहत होता. तरुणी उमरखेड येथील मैदानावर तयारी करत असताना त्याची तरुणीशी ओळख झाली होती.

त्याने जवळीक वाढवत उमरखेड येथील खासगी पोलीस प्रशिक्षण अकादमीत प्रवेश मिळवून देतो व नोकरी लावून देतो, असे आमिष तरुणीला दाखवले. त्याच्या भाड्याच्या घरात तरुणीवर लैंगिक अत्याचार केला. पीडित तरुणीने हटकर याच्या भाड्याच्या घरातच गळफास घेऊन आत्महत्या केली. मुलीच्या वडिलांनी उमरखेड पोलीस ठाण्यात मुलीवर लैंगिक अत्याचार झाल्याची तक्रार दाखल केली.

उत्तरीय तपासणी अहवालातही तरुणीवर अत्याचार झाल्याचे समोर आले. त्यावरून १ जानेवारी रोजी रात्री विजय हटकर याला उमरखेड पोलिसांनी अटक केली आहे. ६ डिसेंबरपासून विजय हटकर सुटीवर होता. दरम्यानच्या काळातच त्याने तरुणीची फसवणूक करून अत्याचार केल्याचे उमरखेडचे ठाणेदार अमोल माळवे यांनी सांगितले.