तीन मुलांच्या आईच्या प्रेमात पडला १७ वर्षीय मुलगा!; लग्नाची तयारी... पण आले कायद्याचे विघ्न!

 
file photo
अमरावती : अमरावती जिल्ह्यात एका विचित्र प्रेमाचं (!) प्रकरण समोर आलं आहे. आपल्या वयापेक्षा दुपटीने मोठ्या असलेल्या तीन मुलांच्या आईच्या प्रेमात १७ वर्षीय मुलगा वेडा झाला. दोघेही एकमेकांच्या प्रेमात आकंठ बुडाले. दोघांनी लग्नाचाही निर्णय घेतला... मुहूर्तही ठरला. मात्र मुलगा अल्पवयीन असल्याने ऐनवेळी बाल संरक्षण कक्ष, पोलीस विभाग आणि गावपंचायतीने हा विवाह थांबवला. काल, २७ डिसेंबर रोजी तळेगाव दशासर पोलीस ठाण्याच्या हद्दीत हा विवाह होणार होता.

सूत्रांच्या माहितीनुसार, अल्पवयीन मुलगा मजुरीसाठी वर्धा जिल्ह्यात जात होता. तिथे कामावरच्या एका वयस्क महिलेशी त्याचे सूत जुळले. तीन मुलांची आई असल्याची कल्पना तिने त्याला दिली होती. दोघेही एकमेकांच्या प्रेमात वेडे झाले. दोघांच्या भेटीगाठी वाढत गेल्याने आता एकमेकांशिवाय राहणे अशक्य असल्याचे त्यांना वाटू लागले. अखेर त्यांनी लग्नाचा निर्णय घेतला.

२७ डिसेंबर रोजी लग्नाचा मुहूर्त ठरला. दोघांच्या या लग्नाची चर्चा वाऱ्यासारखी पसरू लागली. बाल संरक्षण कक्ष आणि पोलिसांनी विवाह थांबवण्याचे प्रयत्न सुरू केले. लग्न सोहळ्याची तयारी अंतिम टप्प्यात आली असताना हा विवाह सोहळा थांबविण्यात आला. अल्पवयीन मुलाचा विवाह करणे हा कायद्याने गुन्हा असल्याचे नवरदेवाच्या कुटुंबियांना सांगण्यात आले. ही कारवाई अमरावतीच्या जिल्हा बालसंरक्षण कक्षाने केली.