१६ वर्षीय मुलीवर मावसभावाचा बलात्कार; तीन महिन्यांची गर्भवती असताना तिने घेतले विष

 
बीड : बहीण- भावाच्या नात्याला काळीमा फासणारी घटना बीड जिल्ह्यात समोर आली आहे. लग्नाचे आमिष दाखवून १६ वर्षीय मुलीवर सख्ख्या मावसभावानेच अत्याचार केला. त्यामुळे मुलगी गरोदर राहिली. बदनामीच्या भीतीने तिने विष घेऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. या प्रकरणी आरोपीविरुद्ध अंबेजोगाई ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अंबेजोगाई तालुक्यातील एका गावात राहणाऱ्या अल्पवयीन मुलीचे नवव्या वर्गापर्यंत शिक्षण झाले असून ती आई-वडिलांसोबत ऊसतोडणीसाठी लातूर जिल्ह्यातील शिरूर अनंतपाळ येथे गेली होती. या ठिकाणी तिने तणनाशक औषध पिऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता. अत्यावस्थेत तिला लातूर येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यावेळी तिने पोलिसांना दिलेल्या जबाबानुसार मागील वर्षभरापासून ती गावाकडे असताना तिचा मावसभाऊ भास्कर गडदे तिच्यावर लैंगिक अत्याचार करत होता.

तुझ्यासोबत मी लग्न करेल, असे आमिष दाखवून व धमकी देऊन तो सतत अत्याचार करत होता. त्यामुळे ती तीन महिन्यांची गरोदर होती. त्यामुळे तिने विष प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केल्याचे पोलिसांना सांगितले होते. या प्रकरणी पीडित मुलीच्या तक्रारीवरून भास्कर गडदे याच्याविरुद्ध अंबाजोगाई ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.